संविधान, विज्ञानाच्या सृष्टीबरोबरच दृष्टी घेणेही आवश्यक: राजवैभव शोभा रामचंद्र
schedule05 May 25 person by visibility 211 categoryसामाजिक

- डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमाला (वर्ष चौथे).
कोल्हापूर : भारतीय नागरिकांनी संविधान आणि विज्ञानाची सृष्टी घेतली, मात्र अद्याप दृष्टी घेणे बाकी आहे, असे प्रतिपादन संविधान संवादक राजवैभव शोभा रामचंद्र यांनी आज केले. आ’लोकशाही युट्यूब वाहिनीवर आयोजित डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमालेमध्ये चौथ्या वर्षीचे पुष्प गुंफताना ते ‘भारतीय संविधानातील वैज्ञानिक दृष्टीकोन’ या विषयावर बोलत होते.
राजवैभव शोभा रामचंद्र यांनी भारतीय संविधान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन या दोहोंच्या अनुषंगाने अत्यंत चिकित्सक मांडणी केली. ते म्हणाले, भारतीय संविधानाने देशातल्या प्रत्येक नागरिकाला एक चेहरा, स्वतःची ओळख दिली. ते आपल्या जगण्याचा एक भाग आहेच, पण ती प्रत्येक भारतीयाला स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता प्रदान करणारी एक मूल्यव्यवस्था आहे. तर कार्यकारणभाव हा वैज्ञानिक दृष्टीकोन आहे. प्रत्येक घटनेमागे काही तरी कारण आहे आणि त्या कारणांचा शोध घेणे हा वैज्ञानिक दृष्टीकोन आहे. विज्ञान नावाची गोष्ट ही खूप विनम्र असते. सर्वच शोध लागलेले नाहीत, पण कधी तरी लागतील, हा विश्वास ती प्रदान देते. त्याचप्रमाणे भारतीय संविधानही खूप विनम्र आहे. विज्ञानवादी असूनही ते या देशातल्या नागरिकांच्या विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांना मान्यता देते. त्यावर घाला घालणाऱ्यांनाही ते पाठीशी घालत नाही. ही फार मोठी खुबी या संविधानामध्ये आहे.
वैज्ञानिक दृष्टीकोनाचा स्पष्टपणे उल्लेख असणारे भारतीय संविधान हे जगातील एकमेव असल्याचे सांगून राजवैभव म्हणाले, भारतीय संविधानाने विज्ञानवादाला आधार देण्याचे महत्त्वाचे काम केले आहे. ५१ व्या कलमामध्ये आम्ही विज्ञानवादाचा प्रचार, प्रसार करू. वैज्ञानिक दृष्टीकोनातून सर्व गोष्टींकडे चिकित्सकपणे पाहू, याची ग्वाही ते देते. स्वातंत्र्य, समता या मूल्यांना विज्ञानाचा आधार आहे. विज्ञान विषमतेला, भेदांना मान्यता देत नाही. जाती, धर्म, भाषा, प्रांत या आधारे श्रेष्ठत्वाचा दावा करणाऱ्यांचे दावे फोल आहेत, कारण त्यांना वैज्ञानिक आधार नाही.
राजवैभव म्हणाले, संविधान सभेत आस्तिक, नास्तिक आणि वास्तविक असे सर्व प्रकारचे लोक असूनही संविधानाच्या प्रास्ताविकेची सुरवात ही ‘आम्ही भारताचे लोक’ या शब्दांनी होणे, हाच या संविधान सभेचा मोठा वैज्ञानिक दृष्टीकोन होता. संविधान या देशातल्या नागरिकांना स्वातंत्र्य देत नाही, तर ते त्यांचे स्वातंत्र्य मान्य करते. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना ही पाच स्वातंत्र्ये संविधान मान्य करते. ही स्वातंत्र्ये उल्लेखत असताना वैज्ञानिक दृष्टीकोन हे कर्तव्यामध्ये दिले आहे. स्वातंत्र्य आपण घेऊ शकतो, मात्र कर्तव्य हे निभावलेच पाहिजे, असा दृष्टीकोन त्यामागे आहे. या देशात संविधानाने प्रत्येक नागरिकाला जिविताचा, सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. मात्र मरण्याचा अधिकार कोणालाही दिला नाही. याचे कारण म्हणजे भारतीय नागरिक हे केवळ एक व्यक्ती नव्हे, तर राष्ट्राची संपत्ती आहेत, हा दृष्टीकोन त्यामागे आहे.
विज्ञान आणि संविधानाची या दोन्ही बाबींची आपण सृष्टी घेतली मात्र दृष्टी घेतली नाही, ही फार मोठी समस्या असल्याचे सांगून राजवैभव म्हणाले, सुखाच्या गावाचा रस्ता शोधणारा मार्ग हे संविधान आणि विज्ञान या दोहोंचेही अंतिम ध्येय आहे. एकाच वेळेला सर्वांचे भले व्हावे, असे मानणारी ही बाब असून सगळ्यांना सर्व मिळावे आणि तेही सगळ्यांना समान पद्धतीने मिळावे, अशी भूमिका त्यामागे आहे. त्याची मूल्येही स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता हीच आहेत. भेदभावाच्या मूल्यांना आपण कवटाळून राहणे घातक ठरणारे आहे. वैज्ञानिक शोधांचा देशाच्या भल्यासाठी, जगाच्या भल्यासाठी वापर करण्याची भावना संविधानातील विज्ञानवाद देतो. दैनंदिन घडणाऱ्या गोष्टींकडे आपण विज्ञानाच्या दृष्टीकोनातून पाहात असू, तर आपण योग्य मार्गावर असतो. संविधानाचा विचार घेऊन पुढे जायचे असेल तर संवैधानिक मूल्ये आणि वैज्ञानिक दृष्टीकोनच आवश्यक आहे. या देशात जे चांगले घडते, ते संविधानाच्या अंगिकारामुळे, जे वाईट घडते ते संविधान नाकारल्याने ही जाणीव सर्वदूर निर्माण होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले.
यावेळी आ’लोकशाही वाहिनीचे संपादक डॉ. आलोक जत्राटकर यांनी स्वागत, प्रास्ताविक करून आभार मानले.