इंदुरमध्ये २८ तृतीयपंथीयांकडून सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न
schedule16 Oct 25 person by visibility 78 categoryगुन्हे

नवी दिल्ली : मध्य प्रदेशच्या इंदुरमध्ये २८ तृतीयपंथीयांनी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला. सर्वांनी फिनाइल प्राशन केल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली असून सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एमवाय रुग्णालयात सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.हे संपूर्ण प्रकरण एका तृतीयपंथीयावर झालेल्या कथित बलात्कार आणि खंडणी प्रकरणाशी संबंधित आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना इंदुरच्या पंढरीनाथ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नंदलालपुरा भागात घडली. याठिकाणी राहणाऱ्या २८ तृतीयपंथियांनी एका खोलीमध्ये दरवाजा बंद करून फिनाइल प्राशन केले. याचा व्हिडीओ तयार करून त्यांनी सोशल मीडियावर टाकला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडला आणि सर्व तृतीपंथी यांना बाहेर काढले आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
नंदलालपुरा येथे दोन तृतीयपंथीयांच्या गटांमध्ये बऱ्याच काळापासून वाद सुरू आहे. येथे एक गट सपना गुरुचा आहे तर दुसरा गट सीमा आणि पायल गुरुचा आहे. दोघांमध्ये अनेकदा वाद होतात. मंगळवारी किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर लक्ष्मी त्रिपाठी देखील इंदूरला आले आणि त्यांनी या वादाबाबत अधिकाऱ्यांची भेट घेतली. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या तृतीयपंथीयांमधील या वादाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. परंतु तपास पूर्ण होऊ शकला नाही.
बुधवारी रात्री तृतीयपंथीचा एका गटाने रस्त्यावर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी एका खोलीत जाऊन दरवाजा बंद करून एकत्रित फिनाइल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. दरम्यान या घटनेनंतर तृतीयपंथीच्या एका गटाने रस्त्यावर चक्काजाम आंदोलन केले. पोलिसांनी सर्वांची समजूत काढत त्यांना बाजूला हटवले आणि वाहतूक सुरळित केली.