गारगोटीत आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल
schedule30 Jan 26 person by visibility 150 categoryराज्य
गारगोटी : भुदरगड तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणकीच्या आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरु असून आचारसंहिता भंग केलेबाबत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती ची निवडणूक जाहीर होताच , सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधिंची मिटिंग घेऊन आचारसंहितेचे पालन , निवडणूक प्रक्रिया, प्रचाराच्या परवानगी व इतर बाबतीत सर्व सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पंचायत समिती भुदरगड कार्यालयात "एक खिडकी कक्ष" स्थापन करण्यात आला असून प्रचाराच्या सर्व परवानगी देण्यात येत आहेत. जाहीर सभा , कोपरा सभा , झेंडे , फ्लेक्स , प्रचार वाहने , प्रचार कार्यालय व इतर अनुषंगिक बाबीसाठी परवानगी घेणे बंधनकारक असून , विना परवानगी प्रचार केल्याचे निदर्शनास येताच , संबंधितावर गुन्हा नोंद करण्यात येईल. तसेच , प्रचार साहित्य लावताना सार्वजनिक जागेचे विद्रुपिकारण होणार नाही , याची देखील दक्षता घेणे आवश्यक आहे.
आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणी साठी भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. सदर भरारी पथकाला कुर भागात राजकीय प्रचाराचे बॅनर लावल्याचे निदर्शनास आले.सदर बॅनरची माहिती घेतली असता , बॅनर लावण्यासाठी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे लक्षात येताच , भरारी पथकाकडून भुदरगड पोलीस स्टेशन येथे युवराज रामचंद्र येडुरे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. युवराज येडुरे हे , भुदरगड तालुक्यातील कुर पंचायत समिती गणाचे , महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत. महाराष्ट्र मालमत्ता विदृपीकरणास प्रतिबंध अधिनियम 1995 चे कलम 3,4 आणि लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 127(अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस विभाग करत आहे.
सर्व राजकीय पक्षांनी व नागरिकांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे. आचारसंहितेचा भंग केल्यास संबंधितांवर गुन्हा नोंद करण्यात येईल , याची नोंद घ्यावी.