सामासिक अंतरातील व फुटपाथवरील अतिक्रमणे तात्काळ हटवा : प्रशासक के.मंजूलक्ष्मी
schedule30 Jan 26 person by visibility 108 categoryसामाजिक
कोल्हापूर : उच्च न्यायालय, कोल्हापूर सर्किट बेंच यांनी दि. २२ जानेवारी २०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार शहरातील सामासिक अंतरातील तसेच फुटपाथवरील अतिक्रमणे तात्काळ हटविण्याचे निर्देश प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी दिले आहेत. यानुसार कोल्हापूर महानगरपालिकेच्या चारही विभागीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात अतिक्रमण हटाव मोहिम तात्काळ सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
याबाबत आज सकाळी आयुक्त कार्यालयात शहर अभियंता, सर्व उपशहर अभियंते तसेच अतिक्रमण विभागाची संयुक्त बैठक घेण्यात आली. बैठकीदरम्यान प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता चौक परिसर व मुख्य रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यावर विशेष भर देण्याचे निर्देश दिले. गरज भासल्यास पोलीस बंदोबस्तात कारवाई करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कारवाई पूर्वी नगररचना विभागाने संबंधितांना नोटिसा बजावाव्यात तसेच संबंधित मिळकतींचे ठिकाणी आवश्यक ते मार्किंग करावे, असे निर्देश देण्यात आले. शिवाजी विद्यापीठ परिसर, केएसबीपी चौक तसेच आरटीओ कार्यालय परिसरातील अनधिकृत वाहने तात्काळ हटविण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. तसेच दैनंदिन अतिक्रमण हटाव कारवाईमध्ये सातत्य ठेवण्यावर प्रशासकांनी भर दिला.
यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, उप-आयुक्त परितोष कंकाळ, सहाय्यक संचालक नगररचना प्रशांत भोसले, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर रचनाकार एन एस पाटील, उपशहर अभियंता निवास पोवार, सुरेश पाटील, अरुण गुजर, इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, कनिष्ठ अभियंता अवधूत नर्लेकर उपस्थित होते.