रंकाळा तलाव सुशोभिकरणाच्या कामाची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून अचानक तपासणी
schedule15 May 24 person by visibility 528 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : महापालिकेच्यावतीने राज्य शासनाच्या व जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून रंकाळा तलावाचे संवर्धन व सुशोभिकरण करण्यात येत आहे. सदरचे काम संथगतीने सुरु असलेबाबत नागरीकांच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे रंकाळा तलाव येथे सुरु असलेल्या या कामाची आज दुपारी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी अचानक जाऊन तपासणी केली.
यावेळी त्यांना या ठिकाणी ठेकेदारामार्फत पुर्ण क्षमतेने कामे सुरु नसलेचे निदर्शनास आले. त्याचबरोबर कामावर ठेकेदाराचे कोणीही कामगार उपस्थित नव्हते. याठिकाणी कोणतीही यंत्रसामुर्गी उपलब्ध नव्हती. त्यामुळे प्रशासकांनी नाराजी व्यक्त करुन सदरचे काम विहित मुदतीत कामे पुर्ण करण्याच्या सूचना ठेकेदारास दिल्या. तसेच कामामध्ये प्रगती नसल्याने शहर अभियंता यांना प्रशासकांनी कारणे दाखवा नोटीस आज बजावली आहे.
कोल्हापूरचे वैभव असलेल्या रंकाळा तलावाला उर्जितावस्था आणण्यासाठी राज्य शासनाकडून भरीव निधी मिळाला आहे. रंकाळा तलाव कोल्हापूरातील नागरीकांची व पर्यटकांच्या विरंगुळयाचे आणि जिव्हाळयाचे ठिकाण आहे. या सुशोभिकरणामुळे रंकाळा तलावाला गतवैभव प्राप्त होणार आहे. त्यामुळे संबंधीत ठेकेदाराकडून त्याला दिलेल्या मुदतीत काम पुर्ण करुन घेण्याच्या सूचना शहर अभियंता यांना दिल्या आहेत.