कोल्हापूर महापालिकेसमोर खेळणी रचून 'आप'चे आंदोलन; उद्यानातील मोडकी खेळणी बदलण्याची मागणी
schedule08 May 25 person by visibility 220 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : शहरात महापालिकेची 54 उद्याने आहेत. यातील अनेक उद्यानांमधील खेळणी मोडलेली आहेत. रंकाळा परिसरातील उद्यानांमध्ये लहान मुलांसाठी असलेली घसरगुंडी व त्याच्या वॉक-वे ला मोठे भगदाड पडल्याने ते मुलांना खेळण्यासाठी धोकादायक बनले आहे. याबद्दल महापालिका प्रशासनाला अनेकवेळा सांगून देखील कार्यवाही होत नसल्याने आम आदमी पार्टीने महापालिकेसमोर खेळणी रचून अनोखे आंदोलन केले.
लालबहाद्दूर शास्त्री उद्यान सदर बाजार, ताराबाई गार्डन, सिद्धार्थनगर मधील दादासाहेब शिर्के उद्यान, रेड्याची टक्कर येथील हुतात्मा स्मारक, इंदिरा गांधी बालोद्यान टेम्बलाईवाडी, श्रीराम उद्यान कसबा बावडा, शेळके उद्यान मंगळवार पेठ येथील वस्तुस्थिती आप पदाधिकाऱ्यांनी महापालिका अधिकाऱ्यांसमोर मांडली.
आंदोलनस्थळी घसरगुंडीवर खेळत लहान मुलांनी महापालिकेच्या कारभाराचे विडंबन समोर आणले. उन्हाळ्याची सुट्टी सुरु झाली आहे. लहान मुलांसाठी असलेली खेळणी जर मोडलेली असतील तर त्यांनी खेळायचे कुठे असा प्रश्न आहे. ही मुले मोडक्या खेळणीवर खेळताना दुखापत झाल्यास महापालिका प्रशासन जबाबदारी घेणार का अशी विचारणा आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केला. त्यामुळे मोडकी खेळणी त्वरित काढून त्याठिकाणी पुढील पंधरा दिवसात नवीन खेळणी बसवण्यात यावी अशी मागणी आपने केली.
यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, सूरज सुर्वे, अभिजित कांबळे, मोईन मोकाशी, दुष्यंत माने, विजय हेगडे, अनिल जाधव, समीर लतीफ, राकेश गायकवाड, संजय नलवडे, उमेश वडर, स्वप्नील काळे, रणजित पाटील, रमेश कोळी, शशांक लोखंडे, प्रथमेश सूर्यवंशी, दिलीप पाटील, मंगेश मोहिते आदी उपस्थित होते.