+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustअटल सेतूच्या मुख्य भागावर कोणतेही तडे नाहीत adjustयेत्या काळात मुंबई प्रदूषण, खड्डे, वाहतूक कोंडीमुक्त करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे adjustकाश्मिरमध्ये लवकरच महाराष्ट्र सदन उभारणार : सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण adjustनियमित योग साधनेतून वैश्विक ऊर्जा प्राप्त : कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के adjustअन्न प्रक्रिया उद्योगातील नोंदणीकृत वैयक्तिक लाभार्थ्यांना प्रशिक्षण adjustसंजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' उत्साहात adjustकोल्हापूर महानगरपालिका : 6 टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी सुट्टीच्या दिवशीही नागरी सुविधा केंद्रे सुरु adjustशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी राजर्षि छत्रपती शाहू महाराज जयंती उत्सवानिमित्त के.एम.टी. उपक्रमामार्फत "ऐतिहासिक वास्तू दर्शन" सहलीसाठी विशेष बससेवा adjustचप्पल लाईन येथील विद्युत सेवावाहिनी शिफ्टिंगचे काम सुरु; 'आप'च्या मध्यस्तीस यश adjustशिवाजी स्टेडियम येथील जलतरण तलावासाठी 35 लाखाची तरतूद करा : आमदार जयश्री जाधव; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना केली सूचना
SMP_news_Gokul_ghee
schedule08 Jun 24 person by visibility 158 categoryसामाजिक
कोल्हापूर : महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसूबाई आणि रतनगड किल्ल्यावरुन गोल बुबुळांच्या प्रदेशनिष्ठ पालींच्या दोन नवीन प्रजातींचा शोध लावण्यात भारतीय संशोधकांना यश आलेले आहे. दोन्ही प्रजाती उंच शिखरांच्या टोकांवरील बेसाल्ट दगडांच्या अधिवासात आढळतात. या संशोधनामध्ये ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन आणि शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांचा सहभाग होता. सदरचे संशोधन हे अक्षय खांडेकर यांच्या शिवाजी विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागामधून सुरु असलेल्या पीएचडी संशोधनाचा भाग आहे आणि प्रा. डॉ. सुनिल गायकवाड त्यांचे मार्गदर्शक आहेत. त्यासोबतच या संशोधनामधे ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे संशोधक तेजस ठाकरे, ईशान अगरवाल, सत्पाल गंगलमाले आणि सौरभ किनिंगे यांचा सहभाग आहे.

नव्याने शोधलेल्या दोन्ही प्रजातींचा समावेश 'निमास्पिस' या कुळामधे केला आहे. गोल बुबुळे हे निमास्पिस कुळातील पालींचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. अहमदनगर जिल्ह्यातील रतनगड किल्ल्यावरुन शोधलेल्या पालीचे नामकरण 'निमास्पिस बेसाल्टीकोला' असे करण्यात आले आहे. बेसाल्ट दगडांवरील मर्यादित वावरावरुन तिचे नामकरण केले आहे. कळसूबाई शिखरावरुन शोधल्या गेलेल्या पालीचे नामकरण तिच्या आढळक्षेत्रावरुन 'निमास्पिस कळसूबाईन्सिस' असे केले आहे. 'निमास्पिस कळसूबाईन्सीस' ही प्रजाती कळसूबाई शिखर आणि त्याच पर्वतरांगेतील अलंग किल्ल्यावर आढळून आली. ही प्रजाती भारतीय द्विपकल्पामधील निमास्पिस कुळातील सर्वांत दक्षिणेकडील प्रजाती ठरली आहे. पाठीवरील ट्युबरकलची संख्या, मांडीवरील ग्रंथींची संख्या, पृष्ठभागाला धरुन राहण्यासाठी आवश्यक बोटांवरील लॅमेल्यांची संख्या आणि वैशिष्ट्यपूर्ण जनुकीय संचांवरुन या पाली एकमेकांपासून आणि कुळातील इतरांपासून वेगळ्या प्रजातीच्या ठरतात.

▪️११०० मीटरपेक्षा अधिक उंचीवर आढळ
"निमास्पिस कुळातील पाली थंड अधिवासातील वावरासाठी ओळखल्या जातात. नव्याने शोधलेल्या दोन्ही प्रजाती ११०० मीटरपेक्षा उंच पर्वतांवरील निम-सदाहरित जंगलांमधील आणि कड्यांवरील बेसाल्ट दगडांवरती आढळतात. कमी उंचीवरील गरम जागा त्यांच्यासाठी अनुकूल नाहीत. या दोन्ही प्रजातींच्या आढळक्षेत्रांमधील सरळ रेषेतील अंतर फक्त ७ किमी. आहे. रतनगड आणि अलंग-कळसूबाई पर्वत रांग यांच्या मध्ये असलेल्या शुष्क-सपाट प्रदेशाने या दोन पालींना एकमेकांपासून वेगळे केले आहे. या वैशिष्ट्यपूर्ण अनुकुलनतेमुळे सदरच्या पाली संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरतात
 🔶️ अक्षय खांडेकर

▪️कळसूबाई शिखर परिसराची जैवविविधता अधोरेखित 
"महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखरावरुन पालीची नवी प्रजाती शोधणे ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. कळसूबाई शिखर, रतनगड आणि अलंग किल्ला या ठिकाणांना महाराष्ट्राच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. रतनगड आणि अलंग शिखरांच्या माथ्यावरील किल्ल्यांनी ऐतिहासिक काळात अनेकांना आश्रय दिला आहे. नव्या पालींसाठी या शिखरांची अग्रस्थाने अशीच आश्रयस्थाने राहीली आहेत. नव्याने शोधलेल्या पाली प्रदेशनिष्ठ आहेत. कळसूबाई-अलंग आणि रतनगड ही आढळक्षेत्रे सोडून त्या इतरत्र कुठेही आढळत नाहीत. प्रस्तुत संशोधनामुळे कळसुबाई, रतनगड आणि अलंग शिखर या ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या परिसरातील जैवविविधतेसंदर्भातील वैशिष्ट्ये अधोरेखित झाली आहेत."
  🔶️ डॉ. सुनिल गायकवाड