संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय यश
schedule19 Oct 25 person by visibility 78 categoryशैक्षणिक

▪️"ईअँडटीसी विभागातील “टीम इंटेलिजंट अर्थलिंग्स” ने जिंकले कॅनसॅट चॅलेंजमधील राष्ट्रीय विजेतेपद!
कोल्हापूर : त्रिवेंद्रम (केरळ) येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी (IIST) या प्रतिष्ठित संस्थेत नुकतीच पार पडलेली कॉन्सेंशिया २०२५ ही भव्य राष्ट्रीयस्तरीय तांत्रिक स्पर्धा संजय घोडावत इन्स्टिट्यूटसाठी ऐतिहासिक ठरली आहे. या स्पर्धेत संजय घोडावत इन्स्टिट्यूट (एसजीआय)* च्या ई अँड टी सी विभागातील “टीम इंटेलिजंट अर्थलिंग्स” या विद्यार्थ्यांच्या चमूने प्रथम क्रमांकाचे विजेतेपद पटकावत अभूतपूर्व यश संपादन केले आहे.
या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातील तेरा नामांकित अभियांत्रिकी संस्थांचे संघ सहभागी झाले होते. त्यामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी), पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी (पीआयसीटी पुणे), एमआयटी-डब्ल्यूपीयू पुणे आणि व्हीआयटी चेन्नई यांसारख्या अग्रगण्य संस्थांचा समावेश होता. या कठीण आणि अत्यंत स्पर्धात्मक परिक्षेत एसजीआयचा संघ एकमेव असा ठरला, ज्यांनी कॅन सॅटेलाइट चे पॅराशूट उड्डाण व डेटा नोंदणी (डेटा लॉगिंग)यशस्वीपणे पूर्ण केले. या उल्लेखनीय कार्यगौरवामुळे संजय घोडावत इन्स्टिट्यूटचा मान राष्ट्रीय स्तरावर उंचावला आहे.
यशस्वी विद्यार्थी झैद मोमिन, आदर्श सूर्यवंशी, गणेश पाटील, इशिका इंगळे, श्रुती सालुंखे आणि मिसबह अत्तर यांनी परिश्रम, नवोन्मेष आणि संघभावनेच्या जोरावर हे यश संपादन केले आहे.
या यशामुळे संजय घोडावत इन्स्टिट्यूट आणि इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार अभियांत्रिकी विभागाचा गौरव अधिकच वृद्धिंगत झाला असून, विद्यार्थ्यांच्या संशोधनात्मक दृष्टीकोनाचा, सर्जनशील क्षमतेचा आणि तांत्रिक कौशल्याचा उत्कृष्ट प्रत्यय यामधून आला आहे.
कॅनसॅट चॅलेंज ही भारतातील एक अत्यंत प्रतिष्ठित स्पर्धा असून, ती वास्तविक उपग्रहाच्या लघुरूपाची रचना, विकास आणि प्रक्षेपण याचे अनुकरण करते. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानाबरोबरच संघभावना, समस्या सोडविण्याची क्षमता आणि नवोन्मेषी विचारशक्तीची कसोटी लागते.
संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ .विराट गिरी, ईअँडटीसी विभागाच्या विभाग प्रमुख प्राध्यापिका आर एम मुल्ला, इन्स्टिट्यूटच्या सर्व प्राध्यापकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.