डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची दुबईस्थित कंपनीमध्ये वार्षिक 11.2 लाख रुपये पॅकेजसह निवड; इन्स्टिट्यूटची विक्रमी झेप
schedule19 Oct 25 person by visibility 276 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची ' ईसा सालेह अल गर्ग ग्रुप ' या दुबईस्थित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये तब्बल 11.2 लाख रुपये वार्षिक पॅकेजसह निवड झाली. संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. या विद्यार्थ्यांची दुबई येथे डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी या पदावर नियुक्ती होईल. डिप्लोमा स्तरावरील विद्यार्थ्यांची ही उल्लेखनीय भरारी निव्वळ कौतुकास्पद आहे, अशी भावना व्यक्त करून पालकांनी इन्स्टिट्यूटप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या उत्तुंग यशाबद्दल इन्स्टिट्यूट आणि विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
हर्षदा सचिन सुतार, ओमकार अंकुश पाटील, निदा तबरेजखान जकाते (सर्व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग), सृष्टी वसंत देसाई, रोहन नितीन रावळ , यश विनोद चंडाळे (सर्व मेकॅनिकल इंजिनिअरिंग) , अथर्व संतोष शिंगारे ( सिव्हिल इंजिनिअरिंग) अशी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे असून सर्वजण सध्या तृतीय वर्षामध्ये शिकत आहेत. कॉम्प्युटर बेस्ड ऍप्टिट्यूड टेस्ट, लेखी चाचणी, प्रत्यक्ष मुलाखत या सर्व टप्प्यांना यशस्वीपणे सामोरे जात या विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले. इन्स्टिट्यूटच्या प्लेसमेंट विभागामार्फत राबविले जाणारे वेगवेगळे उपक्रम आणि प्रशिक्षण यामुळे हे यश प्राप्त झाल्याची भावना विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केली.
' ईसा सालेह अल गर्ग ग्रुप ' हा औद्योगिक आणि ग्राहक क्षेत्रामध्ये तब्बल 30 हून अधिक कंपन्यांचा समावेश असणारा उद्योग समूह आहे. डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूटमध्ये रोजगाराभिमुख उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी होत असून बहुराष्ट्रीय कंपन्यांशी विद्यार्थी संवाद कार्यक्रम आयोजित केला जातो. उद्योग जगताशी मजबूत संबंध आणि स्किल रेडी अभियंते बनवण्यासाठी लक्ष केंद्रित केले जाते. विद्यार्थ्यांचे उज्वल करिअर घडविण्यासाठी मॉक इंटरव्यूज, करिअर गायडन्स सेशन्स यांना प्राधान्य दिले जाते. या उपक्रमां मुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढून रोजगार क्षमतेत लक्षणीय सुधारणा झाली आहे. परिणामी, विविध क्षेत्रातील अनेक कंपन्यांमध्ये इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी यशस्वीपणे कार्यरत आहेत.
संस्थेच्या सचिवा प्राचार्या शुभांगी गावडे , संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्राचार्य विरेन भिर्डी, इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. सुहास सपाटे यांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागात विविध उपक्रमांसाठी प्रोत्साहन दिले. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी प्रा. पी. एस. खाडे यांनी सर्व उपक्रम यशस्वीपणे राबवले. सत्कार प्रसंगी विभागप्रमुख, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.