‘महाज्योती’च्या माध्यमातून होतकरू विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार करू : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
schedule19 Oct 25 person by visibility 64 categoryराज्य

नागपूर : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योतीच्या प्रशासकीय इमारतीचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न आज आकारास आले आहे. येत्या काळात ही प्रशासकीय इमारत आधुनिक आणि विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधायुक्त ठरणार आहे. आपण इतर मागासवर्ग विभागाची स्थापना केल्यामुळे गती मिळाली. या विभागाच्या माध्यमातून होतकरू नवीन पिढी आकारास येईल तसेच त्यांच्या स्वप्नांना बळ मिळून गगनभरारी घेता येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
सदर येथील जिल्हा नियोजन भवन आवारात महाज्योतीच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, वित्त व नियोजन राज्य मंत्री ॲड. आशिष जयस्वाल, गृह राज्यमंत्री पंकज भोयर, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार सर्वश्री प्रवीण दटके, परिणय फुके, कृष्णा खोपडे, विकास ठाकरे, चरणसिंग ठाकूर, आशिष देशमुख, संजय मेश्राम, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद नारिंगे आदी उपस्थित होते.