महात्मा बसवेश्वर पुरस्कारासाठी 21 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
schedule13 Feb 26 person by visibility 108 categoryराज्य
कोल्हापूर : महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार सन 2025-26 या वर्षाकरीता देण्यात येणार असून जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजातील इच्छुक व्यक्ती व त्या समाजाच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या संस्थांनी महात्मा बसवेश्वर सामाजिक समता- शिवा पुरस्कारासाठी आपले अर्ज 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयास सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक सुनिता नेर्लीकर यांनी केले आहे.
समाजसेवक, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, आध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्यिकांसाठी आवश्यक पात्रता - या योजनेनुसार वीरशैव लिंगायत समाजाकरिता समाजकल्याण, समाज संघटनात्मक, कलात्मक अध्यात्मिक प्रबोधन आणि साहित्यिक क्षेत्रात कार्य करणारे तथा कल्याणासाठी झटणा-या नामवंत समाजसेवक, अध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्यिाक असावेत. वीरशैव लिंगायत समाजासाठी कार्य करणारे समाजकल्याण, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, अध्यात्मिक प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात कमीत कमी दहा वर्षे कार्य केलेले असावे. पुरस्कार देताना सामाजिक कार्यकर्त्यांचे वय पुरुषांचे वय ५० वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त असावे तर स्त्रियांचे वय ४० वर्ष अथवा त्यापेक्षा जास्त असावे. वरील क्षेत्रात कमीत कमी १० वर्षे वैयक्तिक किंवा संघटनात्मक अभिजात कार्य करणाऱ्या व्यक्ती या पुरस्कारास पात्र असतील.
सामाजिक संस्थांसाठी पात्रता - समाजकल्याण क्षेत्रात वीरशैव लिंगायत समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण, आरोग्य, अध्यात्मिक विकास करणे, अन्याय निर्मलून करणे, अंधश्रध्दा रूढी निर्मूलन करणे, सामाजिक न्याय मिळवून देणे, समाजाला आरक्षण व संरक्षण मिळवून देणे, सामाजिक व संघटनात्मक जनजागरण करणे इ. क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांना हा पुरस्कार दिला जाईल. संस्था नोंदणीकृत असावी.
अधिक माहितीसाठी सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, तिसरा मजला, विचारे माळ, कोल्हापूर येथे संपर्क साधावा.