मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांचे अभिनंदन
schedule14 Sep 25 person by visibility 133 categoryराज्य

▪️९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड
मुंबई : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ साहित्यिक ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांचे अभिनंदन केले आहे.
‘साहित्य संमेलन म्हणजे अभिजात मराठीचा मानबिंदू. वैभवशाली मराठीच्या वाटचालीतील समृद्ध दालन. अशा या संमेलनाची शतकपूर्तीकडे वाटचाल सुरू आहे. या वाटचालीत सातारा येथे नियोजित ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांची निवड ही यथार्थ अशीच आहे. पाटील यांनी आपल्या दमदार लेखणीतून वैविध्यपूर्ण आणि कसदार साहित्यकृतीची निर्मिती केली आहे. यामुळे मराठी साहित्यात मोलाची भर घातली गेली आहे. त्यांच्या निवडीमुळे साहित्य संमेलन अध्यक्षांच्या आतापर्यंतच्या मालिकेचाही दिमाख वाढता असाच राहिला आहे. ही बाब मराठी साहित्य क्षेत्रातील होतकरूंसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
या निवडीसाठी साहित्य महामंडळाशी निगडित सर्वांचे मनापासून अभिनंदन. ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांचे मनापासून अभिनंदन आणि ९९ व्या साहित्य संमेलनाचे यजमानपद मिळालेल्या सातारकरांना आयोजनासाठी हार्दिक शुभेच्छा, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.