कुतुहल कृत्रिम पावसाचे...!
schedule05 Apr 25 person by visibility 239 categoryसंपादकीय

✍️ डाॅ. सुनीलकुमार सरनाईक.
कोल्हापूर.
पाऊस हा विषय सर्वांच्या जिव्हाळ्याचा व आस्थेचा विषय आहे, पाऊस ही एक हवामानविषयक घटना आहे, जी पृथ्वीच्या पृष्ठभागावरील ढगांमधून पाण्याचे द्रव किंवा घन थेंबांच्या वर्षावमुळे उद्भवते. पाऊस पडला की आवश्यक ती जलप्राप्ती होते, शिवाय पावसामुळे धरणीमाता हिरवीगार होते. निसर्गात सर्वत्र हिरवळ पसरते. नद्या, विहिरी, नाले तुडूंब भरतात.
पाऊस पडण्यासाठी ढगांमधल्या बाष्पाची क्षमता, तापमान, वाऱ्याची दिशा आणि वेग असे अनेक घटक आवश्यक असतात. यातल्या कोणत्याही एका घटकाचा असमतोल झाल्यास पावसाची शक्यता कमी होते. अशावेळी ढगांमधलं बाष्पाचं प्रमाण वाढवून ते विशिष्ट तापमानाला थंड केलं की त्याचं पाण्याच्या थेंबांमध्ये रूपांतर होतं. काळ्या ढगांवर विशिष्ट परिस्थितीत रसायने फवारून पाऊस पाडणे, यालाच कृत्रिम पाऊस म्हणतात.
कृत्रिम पाऊस हा विषय अलिकडे खूप चर्चेत आहे, मात्र बरेच जण त्याबाबतीत अनभिज्ञ आहेत. खरंतर हा विषय तांत्रिक स्वरूपाचा आहे . थोडासा किचकट ही आहे. मात्र हा विषय आपल्या शेतीप्रधान देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना तो माहीत असणे आवश्यक आहे. हे ओळखूनच प्रा.चंद्रसेन टिळेकर यांनी "कृत्रिम पाऊस" या नावाने पुस्तक लिहिले आहे. यापूर्वी अशा विषयावरचे पुस्तक मराठीत नव्हते, या विषयावरचे हे मराठीतले आद्य पुस्तक ठरावे.
प्रा.चंद्रसेन टिळेकर हे संगणक तज्ञ आहेत. त्यांनी आजवर ललित,वैचारिक व तांत्रिक स्वरूपाचे विपुल लिखाण केले आहे.
पाऊस अत्यंत कमी पडला किंवा पडलाच नाही तर दुष्काळा सारखा कठीण प्रसंग ओढवू नये म्हणून शास्त्रज्ञांनी आकाशातल्या ढगातले पाणी आपल्याला हवे असेल तेंव्हा जमिनीवर केव्हा पडावे या दृष्टीने प्रयोग केले आणि त्यातून जन्म झाला तो या 'कृत्रिम पाऊस' या तंत्राचा. आपल्या देशानेही काही वर्षापूर्वी काही राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा हा प्रयोग करून काही प्रमाणात शेतकऱ्यांना तसेच सर्वसामान्य जनतेला दिलासा दिला होता.
अनेकदा आकाशात ढग जमा होऊनही त्यांच्यातून पाऊस पडत नाही तेव्हा आपल्याला वर आकाशात जाऊन त्यांना गदा गदा हलवून त्यांच्यातले पाणी खाली पाडावेसे वाटते. शास्त्रज्ञ अशा वेळी वर आकाशात विमान पाठवून त्यांच्या सहाय्याने ढगांवर विशिष्ट पदार्थांचा मारा करतात जेणेकरून जगातील जलबिंदूचा आकार मोठा होऊन ते खाली जमिनीवर पडतात आणि पाऊस पडतो यालाच आपण कृत्रिम पाऊस म्हणतो. यासाठी अर्थातच अद्ययावत अशा साधनांची, उपकरणांची गरज भासते.
अशा महत्त्वाच्या उपकरणांची माहितीही या पुस्तकात दिली आहे. विशेष म्हणजे या संदर्भात सर्व प्रथम कोणत्या देशांनी प्रयत्न केले व त्यांनी त्यांना आलेल्या अडचणीवर कशी मात केली ते ही विषद केले आहे. विषय नीट समजावा म्हणून या पुस्तकात असंख्य चित्रे व आलेख दिलेले आहेत हे विशेष!
भूगोल या विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच हा विषय शिकवणाऱ्या अध्यापकांनाही हे पुस्तक अत्यंत मौलिक आहे, या विषयावरचे पहिले वहिले पुस्तक प्रकाशित करण्याचा मान पुण्याच्या 'दिलीपराज प्रकाशन' कडे जातो, प्रकाशक व लेखक अभिनंदनास पात्र आहेत.मुखपृष्ठ विषयाला अनुरूप असेच आहे.
✍️ डॉ सुनीलकुमार सरनाईक
▪️कृत्रिम पाऊस
▪️लेखक:प्रा.चंद्रसेन टिळेकर.
▪️अमृतवर्षा सोसायटी, सहारा रोड, अंधेरी (पू),
मुंबई -४००००९
प्रकाशक: दिलीपराज प्रकाशन प्रा.लि.
२५१ क, शनिवार पेठ,
पुणे - ४११०३०
मुखपृष्ठ: संतोष घोंगडे
पृष्ठे:१२४, मूल्य:₹ १८०/-