डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये “मिनी हॅकाथॉन २०२५” स्पर्धेत कृत्रिम बुद्धिमत्तेचे अनोखे प्रदर्शन
schedule03 Dec 25 person by visibility 35 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागात “मिनी हॅकाथॉन २०२५” या राज्यस्तरीय तांत्रिक स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले.
“ए.आय.-पॉवर्ड स्टुडंट फीडबॅक अनालायझर फॉर एज्युकेटर्स” या नाविन्यपूर्ण विषयावर ही स्पर्धा आधारित होती. या स्पर्धेत कोल्हापूर, इचलकरंजी, निपाणी आणि आसपासच्या महाविद्यालयांतील एकूण २०३ विद्यार्थ्यांनी ४९ संघांद्वारे सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, मशीन लर्निंग आणि डेटा व्हिज्युअलायझेशनचा उपयोग करून शिक्षक–विद्यार्थी फीडबॅक प्रणाली अधिक प्रभावी करण्यासाठी नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केले. परीक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे, सर्जनशीलतेचे आणि तांत्रिक कौशल्याचे कौतुक केले. त्यांच्या मते आजची तरुण पिढी समाजातील वास्तव समस्यांकडे नव्या दृष्टिकोनातून पाहत असून अशा स्पर्धा देशाच्या भावी तंत्रज्ञान नेतृत्वाची पायाभरणी करतात.
स्पर्धेत प्रथम क्रमांक गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोल्हापूर येथील श्रेया जोशी, रासिका पाटील, शार्दुल कोळेकर आणि धनश्री माने यांच्या टीमने पटकावला. द्वितीय क्रमांक डी.के.टी.ई. टेक्सटाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट, इचलकरंजी येथील रवीराज मोरे, स्वराज शिंदे आणि देविका यादव यांच्या टीमला मिळाला, तर तृतीय क्रमांक व्ही.एस.एम. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, निपाणी येथील आदित्य खारडे, अब्दुलवहाब मुल्ला, संदीश बिरण्णावर, पंकज बाबळेश्वर आणि प्रतीक्षा चौगुळे यांच्या टीमने मिळवला. संपूर्ण स्पर्धेचे समन्वयन आणि संचालनाची जबाबदारीही प्रा. विकास बसवंते यांनी अत्यंत सुरळीतपणे पार पाडली.
कार्यक्रमाचे आयोजन, व्यवस्थापन आणि तांत्रिक सहाय्य संगणक अभियांत्रिकी विभागातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्साहाने पूर्ण केले. कार्यक्रमानंतर विजेत्यांना प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले व समूह छायाचित्रांनी कार्यक्रमाची सांगता झाली.
संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्राचार्य विरेन भिर्डी व इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. सुहास याप्रसंगी उपस्थित होते. परीक्षक म्हणून श्री. तेजसकुमार कांबळे (सीनियर प्रिन्सिपल आय.टी. इंजिनिअर), श्री. सदानंद होवाल (टेक लीड ए.आय., इन्फोसिस, पुणे) आणि सौ. प्रियांका पाटील (सीनियर बिझनेस अॅनालिस्ट, टी-कॉग्निशन, कोल्हापूर) यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणांचे मूल्यमापन केले.
स्पर्धेच्या यशस्वी संचालनासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिवा प्राचार्या शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, गौरव गावडे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन प्रा. विकास बसवंते यांनी उत्साहपूर्ण शैलीत कौशल्याने केले.“मिनी हॅकाथॉन २०२५” ने विद्यार्थ्यांमध्ये नवकल्पनांचा आत्मविश्वास निर्माण करत तंत्रज्ञान आणि शिक्षण क्षेत्रातील नवे क्षितिज उघडले आणि हा उपक्रम खऱ्या अर्थाने ‘कल्पकतेचा उत्सव’ ठरला.