डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचा कोकण कृषी विद्यापीठाशी सामंजस्य करार
schedule29 Apr 25 person by visibility 244 categoryशैक्षणिक

तळसंदे : डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे व डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्यात नुकताच सामंजस्य करार संपन्न झाला. या करारामुळे दोन्ही संस्थांना कृषीविज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर संशोधन करण्यासाठी नवे व्यासपीठ मिळाले आहे. विद्यार्थी- प्राध्यापक विनिमय कार्यक्रम,जोड प्रकल्प, प्रगत संशोधन अशा बहूआयामी बाबी राबविण्यात येणार आहेत.
दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठात हा सामंजस्य करार संपन्न झाला. यावेळी डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.संजय भावे व डी.वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. के. प्रथापन, तसेच कोकण कृषी विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. डॉ. हाळदवणेकर, कृषी विभाग सहयोगी अधिष्ठाता डॉ.मकरंद जोशी, कृषी अभियांत्रिकी विभाग सहयोगी अधिष्ठाता डॉ. पी. व्ही. शहारे, नियंत्रक श्रीमती अपर्णा पित्रे, विद्यापीठ अभियंता श्रीमती राजश्री देसाई, संशोधन उपसंचालक डॉ. प्रकाश क्षीरसागर व डॉ.जनार्दन ढेकळे आदी उपस्थित होते.
डी. वाय. पाटील कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. प्रथापन यांनी "डी वाय पाटील" ग्रुप बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.ते म्हणाले " दोन्ही विद्यापीठे मिळून भविष्यात संशोधन उपक्रम राबवू व गरीब, होतकरू विद्यार्थ्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधनासाठी संधी उपलब्ध करून देऊ."
कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.संजय भावे म्हणाले, या कराराद्वारे संयुक्तिरीत्या आंतराष्ट्रीय परिषदा, चर्चासत्र व कार्यशाळा घेऊ व भविष्यात राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय पातळीवर संशोधन करण्यासाठी दोन्ही संस्था पुढाकार घेतील.
कुलसचिव डॉ.हाळदवणेकर यांनी या कराराबद्दल आनंद व्यक्त करीत विद्यार्थी शिक्षक विनिमय, संशोधन शोधनिबंध, प्रस्ताव, सेमिनार, संयुक्तरित्या राबविण्यासाठी कटिबद्ध राहू असे आश्वासन दिले.
हा करार यशस्वी करण्यासाठी डॉ.जनार्दन ढेकळे व डॉ.प्रकाश क्षीरसागर यांनी अथक परिश्रम घेतले.