स्टार एअरवेजकडून आता बेंगलोर आणि हैदराबादसाठी विमानसेवा सुरू, कोल्हापूर विमानतळाच्या हवाई सेवेचे विस्तारीकरण
schedule29 Apr 25 person by visibility 502 categoryराज्य

कोल्हापूर : स्टार एअरवेज कडून कोल्हापूर विमानतळावरून विविध शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. सध्या स्टार एअरवेज कडून कोल्हापूर ते तिरुपती, अहमदाबाद, मुंबई या शहरांसाठी विमानसेवा दिली जातेे. त्यामध्ये आता बेंगलोर आणि हैदराबाद या दोन शहरांची भर पडली आहे. त्यामुळे बेंगलोर आणि हैदराबाद या दोन शहरांसाठी आता कोल्हापुरातून इंडिगो आणि स्टार एअरवेज या दोन कंपन्या हवाई सेवा देणार आहेत.
कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी आणि विविध अंगाने विस्तारीकरण होण्यासाठी, खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यामुळेच विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीसह कोल्हापूरची हवाई सेवा विस्तारत आहे. साहजिकच कोल्हापूरच्या कृषी, उद्योग, पर्यटन विकासासाठी त्याचा लाभ होत असून, अनेक घटकांचे आर्थिक उत्पन्न वाढत आहे. आता १५ मे पासून, स्टार एअरवेज या कंपनीकडून हैदराबाद आणि बेंगलुरु या मार्गावर नव्याने विमानसेवा सुरू होत आहे. सध्या इंडिगो कंपनी मार्फत या दोन्ही मार्गावर विमान उड्डाण करते. पण प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्यामुळे स्टार एअरवेजने कोल्हापूर - हैदराबाद - कोल्हापूर ही विमानसेवा दर मंगळवारी आणि बुधवारी सुरू करण्याचे घोषित केले आहे.
सकाळी ९ वाजून ३५ मिनिटांनी स्टारचे विमान हैदराबाद वरून उड्डाण करेल आणि दहा वाजून ४० मिनिटांनी कोल्हापुरात येईल. त्यानंतर दुपारी तीन वाजता कोल्हापूर विमानतळावरून उड्डाण केलेले स्टार एअरवेजचे विमान, ४ वाजून ५ मिनिटांनी हैदराबाद मध्ये पोहोचेल. तर प्रत्येक मंगळवार, बुधवार आणि रविवार या दिवशी कोल्हापूर - बेंगलोर- कोल्हापूर या मार्गावर, स्टार एअरवेजचे विमान प्रवाशांना सेवा देईल. कोल्हापुरातून सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी विमान उड्डाण घेईल आणि १२ वाजून ३५ मिनिटांनी विमान बेंगलोर मध्ये उतरेल. तर बेंगलोर मधून दुपारी १ वाजून ५ मिनिटांनी विमान कोल्हापूरच्या दिशेने उड्डाण करेल आणि २ वाजून ३५ मिनिटांनी कोल्हापुरात येईल. स्टार एअरवेजच्या या नव्या प्रवासी सेवेमुळे उद्योग क्षेत्रातील विशेषतः आयटी आणि वैद्यकीय क्षेत्रातील लोकांची मोठी सोय झाली आहे.
राज्यातील आणि देशातील प्रमुख शहरांशी कोल्हापूर हवाई मार्गे जोडले जावे, यासाठी खासदार धनंजय महाडिक सातत्याने प्रयत्नशील असून, त्याला प्रत्येक टप्प्यावर यश मिळत आहे.
