अल्पसंख्याकांच्या उन्नतीसाठी सर्वसमावेशक शिक्षण पद्धतीवर भर देणार : अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान
schedule29 Apr 25 person by visibility 264 categoryराज्य

▪️ अल्पसंख्याकांच्या शाळांत अपात्र शिक्षक आढळून आल्यास संस्थांवर कारवाई
▪️ अल्पसंख्याक मुला- मुलींना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील
▪️ उर्दू शाळांमध्ये मराठी, इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमात शिक्षण देण्यासाठी प्रयत्न
कोल्हापूर : अल्पसंख्याक समाजात मुस्लीम, बौध्द, ख्रिश्चन, जैन, शीख, पारशी व इतर धर्मांचाही समावेश होतो. देशाच्या प्रगतीसाठी दर्जेदार शिक्षण देणे आवश्यक आहे. अल्पसंख्याक समाजाच्या उन्नतीसाठी या समाजाच्या मुला मुलींसाठी सर्वसमावेशक शिक्षण पद्धती राबवण्यावर भर देण्यात येणार असून तसे पत्र शासनाकडे पाठवण्यात आल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) प्यारे जिया खान यांनी केले.
अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी पंतप्रधानांच्या नवीन 15 कलमी कार्यक्रमाचा आढावा अध्यक्ष श्री खान यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला, यावेळी ते बोलत होते. यावेळी जैन अल्पसंख्यांक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलीस उपअधीक्षक निकेश खाटमोडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, शिक्षणाधिकारी (प्राथमिक.) मीना शेंडकर, मौलाना अब्दुल कलाम आझाद अल्पसंख्यांक महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक उदय कांबळे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
अध्यक्ष खान म्हणाले, सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विचारांनी देशातील प्रत्येक घटकाचा विकास साधला जात आहे. या समाजाचा सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या वतीने अनेक योजना व उपक्रम राबविण्यात येत आहेत, या योजनांची व्यापक प्रसिद्धी करा. अल्पसंख्यांकांसाठीचा निधी तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवा. अल्पसंख्यांकांच्या खाजगी शाळांची तपासणी करुन शिक्षकांची शैक्षणिक पात्रता तपासा. अपात्र शिक्षक भरती झाल्याचे आढळून आल्यास संबंधित संस्थांवर कारवाई करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
आधुनिक शिक्षण पद्धतीमुळेच देशाचा आणि समाजाचा विकास होवू शकतो. त्यामुळे मदरस्यांचे आधुनिकीकरण ही योजना प्रभावीपणे राबवा. मदरस्यांमध्ये उर्दुसोबतच, हिंदी, इंग्रजी, मराठी भाषा शिकवणे आवश्यक आहे. तसेच सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्यासाठी विचार करण्यात येत आहे. अल्पसंख्याक शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयीसुविधा असणे आवश्यक असून यादृष्टीने शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी करावी.
अल्पसंख्याक समाजाच्या प्रगतीसाठी पात्र लाभार्थ्यांना कर्ज उपलब्ध करुन द्या. मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना महामंडळाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी अमोल येडगे व विविध विभाग प्रमुख यांनी जिल्ह्यात अल्पसंख्यांकांसाठी राबवण्यात येत असलेले विविध उपक्रम, व शासकीय योजनांच्या अंमलबजावणी बाबत माहिती दिली.