कोल्हापूर : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या ' ग्रीन क्लब'च्या वतीने 'पर्यावरणपूरक गणेशोत्सव' हा विधायक उपक्रम राबविण्यात आला. नागरिकांद्वारे त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
घरगुती गणेश विसर्जनप्रसंगी क्लबद्वारे रंकाळा तलाव येथे गणेश मूर्ती संकलित करण्यात आल्या. निर्माल्य कुंडाची व्यवस्था करण्यात आली , त्यामध्ये गणेश पूजेमध्ये वापरण्यात आलेली फुले,हार व इतर तत्सम साहित्य यांची साठवण करण्यात आली. सजावटीसाठी वापरण्यात आलेले प्लास्टिक साहित्य एकत्र करण्यात आले. त्यामुळे, तलाव प्रदूषण न होता पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लागला. संकलित केलेल्या गणेश मूर्ती पुढील कार्यवाहीसाठी महानगरपालिका प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आल्या. रंकाळा तलाव येथे कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन, कोल्हापूर पोलीस आणि व्हाईट आर्मी यांचेद्वारे गणेश विसर्जननिमित्त सुरू असणाऱ्या उपक्रमांमध्ये इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी त्यांना सहाय्य केले.
'दरवर्षी गणेश मूर्तींचे , निर्माल्याचे विसर्जन तलाव किंवा नदीत न करता कृत्रिम कुंडात विसर्जन करावे किंवा मूर्तीदान करावे. डॉल्बी साऊंड सिस्टिम, लेझर, फटाके यांचा वापर न करता पारंपारिक साधनांचा वापर करावा. त्याद्वारे पर्यावरण संवर्धन साधावे' असे प्रबोधन विद्यार्थ्यांनी केले.
या उपक्रमात प्रा. तन्मय कुलकर्णी, प्रा. गीता साळोखे तसेच इन्स्टिट्यूटच्या सर्व विभागातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्रा. विरेन भिर्डी, इन्स्टिट्युटचे प्राचार्य डॉ. सुहास सपाटे यांनी विद्यार्थ्यांना या उपक्रमासाठी प्रोत्साहन दिले. संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिवा प्रा. शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांचे या उपक्रमासाठी विशष मार्गदर्शन मिळाले.