दादा गेले! आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय कठीण
schedule28 Jan 26 person by visibility 111 categoryराज्य
▪️उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शोकमग्न श्रद्धांजली
मुंबई : जमिनीशी घट्ट नाळ असलेले जननेते, माझे मित्र आणि सहकारी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना मनाला अत्यंत व्यथित करणारी आहे. मनाला चटका लावणारी आहे. मन सुन्न झाले आहे. भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, अशा शोकमग्न भावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री, राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांना शोकमग्न श्रद्धांजली अर्पण केली आहे.
'माझा दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला आहे. माझ्यासाठी ही वैयक्तिक हानी आहे. हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय कठीण आहे. मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या अपघातात अन्य ४ जणांचा मृत्यू झाला.
त्यांच्याही कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे नमूद करून मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.