जपानच्या सागा प्रांताच्या गव्हर्नरच्या शिष्टमंडळाने घेतली पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची भेट
schedule07 Feb 26 person by visibility 93 categoryराज्य
🟠 नदी पुनरुज्जीवन आणि प्लास्टिकमुक्त जलस्रोत हा राज्याचा प्राधान्यक्रम;
🟠 जपानचे सहकार्य यासाठी मोलाचे- मंत्री पंकजा मुंडे
🟠 पर्यावरण, प्लास्टिक मुक्ती, शिक्षण, दुग्ध व्यवसाय आदी विषयांवर झाली सविस्तर चर्चा
मुंबई : राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांची आज जपानमधील सागा प्रांताचे गव्हर्नर व उच्चस्तरीय शिष्टमंडळाने भेट घेऊन पर्यावरण, प्लास्टिक मुक्ती, शिक्षण आदी विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली.नदी पुनरुज्जीवन आणि प्लास्टिकमुक्त जलस्रोत हा राज्याचा प्राधान्यक्रम असून यासाठी जपानचे सहकार्य मोलाचे ठरेल असा विश्वास पर्यावरण व दुग्धविकास मंत्री श्रीमती मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.
समुद्रातील व नदीतील प्रदूषण रोखणे, प्लास्टिक कचऱ्याविरुद्ध संयुक्त प्रयत्न करणे तसेच शिक्षण, पशुसंवर्धन आणि सौंदर्यप्रसाधन उद्योग क्षेत्रात सहकार्य वाढविण्याबाबतही यावेळी महाराष्ट्र आणि जपानच्या शिष्टमंडळात सकारात्मक चर्चा झाली.
पर्यावरण व वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या 'रामटेक' या शासकीय निवास्थानी झालेल्या या बैठकीला जपानच्या सागा प्रांताच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व सागा प्रांताचे गव्हर्नर योशिनोरी यामागुची यांनी केले. त्यांच्यासमवेत प्रादेशिक देवाणघेवाण विभागाचे उपमहासंचालक मसाहिरो ओनो, आंतरराष्ट्रीय धोरण गटाचे उपसंचालक कोजी योशिताके, प्रकल्प प्रमुख कोकी कनामारू आणि जेट्रो सागाचे मुख्य संचालक हिरोशी योनेयामा उपस्थित होते.
तर राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव डॉ. एन. रामास्वामी, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव देवेंद्र सिंह आदी उपस्थित होते.
महाराष्ट्राला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. मात्र, समुद्रातून वाहून येणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. त्याचबरोबर नद्यांमधील प्रदूषण हीदेखील चिंतेची बाब असून, भारतीय संस्कृतीत नद्यांचे पवित्र स्थान लक्षात घेता त्यांच्या स्वच्छतेसाठी राज्य शासन विशेष कार्यक्रम हाती घेणार आहे, असे मंत्री श्रीमती मुंडे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी राज्यपाल यामागुची यांनी जपानकडील तांत्रिक ज्ञान, व्यवस्थापन अनुभव आणि संशोधन क्षमता महाराष्ट्रासोबत सामायिक करण्याची तयारी दर्शवली. आशियाई समुद्रातील प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी “ज्ञान भागीदारी”च्या माध्यमातून संयुक्त उपक्रम राबविण्याबाबत दोन्ही बाजूंनी सकारात्मक भूमिकेवर यावेळी चर्चा झाली.
🟠 दुग्ध व्यवसायावरही बैठकीत चर्चा
बैठकीत शिक्षण क्षेत्रातील सहकार्यालाही विशेष महत्त्व देण्यात आले. पर्यावरणीय शाश्वतता, पशुविज्ञान आणि वैज्ञानिक संशोधनासाठी परदेशी विद्यापीठांना राज्यात संधी उपलब्ध करून देण्याची तयारी पर्यावरण मंत्री श्रीमती मुंडे यांनी व्यक्त केली. सागा प्रांतामधील संस्थांबरोबर संयुक्त संशोधन, विद्यार्थी देवाणघेवाण आणि तांत्रिक सहकार्याच्या शक्यता यावरही यावेळी चर्चा झाली.
दुग्धव्यवसाय आणि पशुसंवर्धन क्षेत्रातील नवकल्पना तसेच सौंदर्यप्रसाधन उद्योगातील जपानचे प्रगत तंत्रज्ञान महाराष्ट्रासाठी उपयुक्त ठरू शकते, असे शिष्टमंडळाने नमूद केले. या क्षेत्रांत औद्योगिक व शैक्षणिक सहकार्य वाढविण्याची परस्पर तयारीही व्यक्त करण्यात आली.
🟠 पर्यावरण मंत्री यांना जपानचे निमंत्रण
प्लास्टिक व्यवस्थापनासाठी उभारण्यात येणाऱ्या वर्ल्ड ओशन प्लास्टिक प्लॅनिंग सेंटर या केंद्राला भेट देण्याचे निमंत्रण राज्यपाल यामागुची यांनी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना दिले.
भविष्यात परस्पर दौरे, तांत्रिक कार्यशाळा आणि दीर्घकालीन सहकार्य आराखडा तयार करण्याबाबत यावेळी चर्चा झाली.
पर्यावरण संरक्षण, शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील भारत-जपान सहकार्याला ही बैठक नवे परिमाण देणारी ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.