जनमत न मिळण्याची शंका असल्यानेच निवडणुकांबाबत चालढकल : आमदार सतेज पाटील
schedule12 May 25 person by visibility 297 categoryराजकीय

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका पुढे ढकलण्याचे वक्तव्य महायुतीचे नेते करत आहेत. त्यांना जनमत मिळेल की नाही अशी शंका असल्यानेच ते अशी वक्तव्ये करत असल्याचा आरोप काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केला. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत कोल्हापुरात शक्य होईल तिथे महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आमदार पाटील म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या निवडणुका राज्य सरकारला घ्याव्याच लागतील. पावसाळ्यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकाच वेळी राज्य शासन घेऊ शकते काय? अशी शंका आमच्याही मनात आहे. मात्र, याबाबत राज्य सरकारने सर्व पक्षांना बोलवून चर्चा करावी. महायुतीची सत्ता आल्यापासून कारभार वाईट सुरु आहे. त्यामुळे जनमत मिळल की नाही ही शंका महायुतीला असल्यानेच ते निवडणुका घेण्याबाबत चालढकल करत असल्याची टीका त्यांनी केली.
🟣 राज्यात महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्षांनी आतापर्यंत एकत्रित काम केले आहे. यापुढेही यामध्ये कुठलीही अडचण येईल असे वाटत नसल्याचा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला.
🟣 अलमट्टी धरणाच्या उंचीविरोधात तेलंगणा सरकार सुप्रीम कोर्टात गेले आहे. त्याठिकाणी पार्टी होवून हे हाणून पाडण्याच काम राज्य सरकारने कणखर भूमिका घेऊन करावे अशी मागणीही आमदार पाटील यांनी केली.