वेदनेचे समाजशास्त्र समजून घेण्याची गरज : ‘जेएनयू’तील प्रा. विवेक कुमार यांचे मत; प्रा. जगन कराडे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार
schedule11 May 25 person by visibility 325 categoryसामाजिक

कोल्हापूर : कौटुंबिक आणि सामाजिक अंत:प्रवाह समजून घेताना वेदनेचे समाजशास्त्रही समजून घेण्याची आज महत्त्वाची गरज आहे. समाजशास्त्राच्या अभ्यासकांनी हे आव्हान पेलले पाहिजे, असे मत जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्रा. विवेक कुमार यांनी येथे व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र अधिविभागाचे माजी प्रमुख तथा ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ डॉ. जगन कराडे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त रविवारी (दि. ११) त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. हरिष भालेराव होते.
यावेळी धारवाडच्या कर्नाटक विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. जयश्री एस. विशेष उपस्थित होत्या. व्यासपीठावर ज्येष्ठ प्रा. डी. श्रीकांत, प्रा. प्रल्हाद जोगदंड, प्रा. रमेश मांगलेकर, प्रा. सुजाता कराडे उपस्थित होते. प्रा. कराडे यांचा शाल, श्रीफळ, मानपत्र, कोल्हापुरी फेटा देऊन सत्कार करण्यात आला.
प्रा. विवेक कुमार यांनी ‘सोशिऑलॉजी ऑफ प्रॉब्लेम्स अँड पेन्स ऑफ अदर्स’ या विषयावर मांडणी केली.
त्यांनी चार्वाक, संत रविदास ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाजशास्त्रीय सैद्धांतिक मांडणीचा आढावा घेतला. याशिवाय आधुनिक समाजशास्त्रज्ञांच्या भूमिकांचीही चिकित्सात्मक मांडणी केली. ते म्हणाले, या सर्व समाजसुधारकांनी सामाजिक प्रश्नांची उकल केली. एक नवा विचार समाजासमोर ठेवला. टाकाऊ पारंपरिक मूल्यांना छेद दिला. कारण ते समाजातील दु:खाच्या मुळाशी गेले. आधुनिक समाजात वावरत असताना वंचित, सर्वहारा समाज आणि दुर्लक्षित घटकांची दु:खे सामाजिक प्रश्नांच्या अभ्यासकांनी समजून घेतली पाहिजे. त्यांच्या प्रश्नांची उकल केली पाहिजे.
आज कुटुंबव्यवस्थेपासूनच व्यापक समाजातील गुंतागुंत आणि अंतर्विरोध वाढले आहेत. त्याचा विवेकी वेध घेताना त्या प्रश्नांच्या सोडवणुकीचा मार्गही समाजशास्त्राच्या अभ्यासकांनी सांगितला पाहिजे, अशी अपेक्षा प्रा. विवेक कुमार यांनी व्यक्त केली.
प्रा. डॉ. हरिष भालेराव यांच्यासह प्रा. प्रल्हाद जोगदंड, संजय कोळेकर-पुणे, अरविंद हळदणकर-गोवा, संदीप चौधरी- छत्रपती संभाजीनगर, रमेश मांगलेकर-बेळगाव, शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागातील ज्येष्ठ प्रा. डॉ. पी. एस. कांबळे आणि ‘प्रा. जगन कराडे : विविध पैलू’ या प्रा. कराडे यांच्या व्यक्तिमत्वाचा आढावा घेणाऱ्या पुस्तकाचे संपादक प्रा. डॉ. गिरीष मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. मोरे यांच्यासह या पुस्तकाचे सहसंपादक कुमार कांबळे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. एस. एस. महाजन, प्रा. जी. बी. अंबपकर, प्रा. एन. डी. जत्राटकर, डॉ. एम. एच. मक्वाना-अहमदाबाद, डॉ. एस. एल. गायकवाड-छत्रपती संभाजीनगर, सी.टी. कांबळे-नांदेड, किशोर राऊत-अमरावती, किरण सुरवसे, विकास शेवाळे-पुणे, सुरेश माने, अॅड. भारत शिंदे आणि प्रकाश आवारे-सांगली यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.