आपत्कालीन व्यवस्थापन कार्यशाळेमुळे अपघात विरहित जीवन जगण्यास मदत ; प्राचार्य महेश आवटे
schedule08 Jan 25 person by visibility 156 categoryसामाजिक
कोल्हापूर : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील एक, दोन वर्षाचे व्यवसाय पूर्ण झाल्यानंतर शिकाऊ उमेदवारीसाठी प्रशिक्षणार्थी कंपनी आस्थापनेत जात असतो. कंपनी आस्थापनेत गेल्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांकडून कोणताही अपघात होणार नाही यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन विषयी कार्यशाळा अतिशय मोलाची ठरेल व याचा उपयोग सर्वांना वैयक्तिक जीवनात होईल व अपघात विरहित जीवन जगण्यास मदत होईल, असे प्रतिपादन संस्थेचे प्राचार्य महेश आवटे यांनी केले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कोल्हापूर, राष्ट्रीय सेवा योजना नियमित कार्यक्रमांतर्गत दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी कोल्हापूर महानगरपालिकेच्या सहकार्याने आग व अग्निशामके याबाबतचे आपत्कालीन व्यवस्थापन विषयी कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेमध्ये आग लागल्यानंतर कोण कोणती उपाययोजना करावी लागते तसेच अपघातजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास त्यातून आपण कसे सुखरुप बाहेर पडू शकतो या विषयाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. आग विझवण्यासाठी वापरली जाणारी उपकरणे याविषयी माहिती देण्यात आली. प्रशिक्षणार्थ्यांकडून आग विझवण्याचे व आपत्कालीन परिस्थितीत धैर्य ठेवून आपण सुखरुप बाहेर पडण्यासाठी केलेल्या उपाय योजनेची प्रात्यक्षिक करुन घेण्यात आली. तसेच बचाव कार्य याविषयी प्रशिक्षणार्थ्यांसमवेत चर्चा केली.
गॅसमुळे होणाऱ्या दुर्घटनेची माहिती देण्यात आली व त्यावर कोणती उपाययोजना करता येईल व स्वयंपाक गृहाची रचना कशी असावी याविषयी माहिती देण्यात आली. फायरमन विषयी सखोल माहिती सांगून नोकरीच्या संधी विषयी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास 750 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
प्रभारी स्थानक अधिकारी जयवंत खोत यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी सतीश माने व अभिजीत पोवार यांनी काम पाहिले तसेच संस्थेतील गटनिदेशक श्री. तिके व श्री. शिंदे आणि निदेशक, कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.