गारगोटी येथे जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचे शनिवारी उद्घाटन
schedule08 Jan 25 person by visibility 208 categoryसामाजिक
कोल्हापूर : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, कोल्हापूर व शासकीय, स्वयंसेवी संस्था, बाह्य शाळांमधील बालकांसाठी जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सव 2024-25 बाल स्नेह मेळावा व क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन शनिवार दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता श्री मौनी विद्यापीठ, गारगोटी (पटांगण) ता. भुदरगड येथे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुहास वाईंगडे यांनी दिली आहे.
कार्यक्रम मौनी विद्यापीठाचे चेअरमन मधुकर आप्पा देसाई, आजरा-भुदरगडचे उपविभागीय अधिकारी हरेश सुळ, भुदरगडच्या तहसिलदार डॉ. अर्चना पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिल्पा पाटील, मौनी विद्यापीठाचे प्राचार्य डॉ. पी.बी.पाटील, कर्मवीर हिरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शशिकांत चव्हाण, बाल न्याय मंडळाचे सदस्य शशिकांत कुरणे व बाल कल्याण समितीच्या सदस्या अँड.अश्विनी खाडे, अँड. शिल्पा सुतार व पद्मजा गारे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सव दिनांक 11 ते 13 जानेवारी 2025 या कालावधीत श्री मौनी विद्यापीठ, गारगोटी (पटांगण) ता. भुदरगड येथे आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवांतर्गत यामध्ये खो-खो, कबड्डी,100 मी.धावणे, 100X4 रिले, कॅरम, लांब उडी, गोळा फेक, बुध्दीबळ, चित्रकला, वत्कृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, डॉज बॉल, लंगडी, क्रिकेट, उंच उडी, वैयक्तिक गायन स्पर्धा, समुह गायन, वैयक्तिक नृत्य आणि सामुहिक नृत्य या क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेकरिता महिला व बाल विकास विभागांतर्गत असणाऱ्या बालगृहातील 500 मुले/मुली या क्रिडा स्पर्धेसाठी उपस्थित राहणार आहेत.
महोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ सोमवार दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी दुपारी 3 वाजता के.डी.सी.सी.बँकेचे संचालक प्राचार्य अर्जुन आबिटकर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे, अशी माहितीही श्री. वाईंगडे यांनी कळविले आहे.