तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक विकास कार्यक्रमाचा उत्साहात प्रारंभ
schedule27 Jan 26 person by visibility 93 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : वारणानगर (ता. पन्हाळा) — येथील तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, वारणानगर येथे प्राध्यापक व संशोधकांसाठी आयोजित “प्रभावी संशोधन लेखन व अभियांत्रिकी संशोधन” या विषयावरील सात दिवसीय प्राध्यापक विकास कार्यक्रमाचा (FDP) उद्घाटन समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला.
या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी एन. एच. पाटील होते. कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून माननीय डॉ. पी. एस. पाटील, तर सन्माननीय अतिथी म्हणून डॉ. सी. डी. लोखंडे उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विलास कारजिन्नी उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना मान्यवरांनी गुणवत्तापूर्ण संशोधनाची आवश्यकता, प्रभावी शैक्षणिक लेखनाचे तंत्र तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संशोधन नियतकालिकांमध्ये प्रकाशनाचे महत्त्व अधोरेखित केले. संशोधन हे केवळ शैक्षणिक गरज नसून समाजोपयोगी आणि उद्योगाभिमुख असावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास वारणा विविध उद्योग शिक्षण समूहाचे अध्यक्ष माननीय आमदार डॉ. विनय कोरे तसेच वारणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्राचार्य डॉ. डी. एन. माने, अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे आणि डॉ. आर. बी. पाटील उपस्थित होते.
या प्राध्यापक विकास कार्यक्रमासाठी खालील तज्ज्ञ रिसोर्स पर्सन म्हणून मार्गदर्शन करणार आहेत : डॉ. फारूक ए.एस.काझी VJTI मुंबई, डॉ. ए. सी. अडमुठे rit, ईश्वरपूर, डॉ. श्रीकांत तांगडे फ्रान्स, डॉ. व्ही. एम. फल्ले VJTI मुंबई आणि डॉ. टी. सौद IIT कानपूर.
या प्राध्यापक विकास कार्यक्रमास महाविद्यालयातील विविध विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक, संशोधक तसेच मोठ्या संख्येने प्राध्यापक वर्ग उपस्थित होता. ही कार्यशाळा प्राध्यापकांच्या संशोधन क्षमतेत वाढ घडवून आणण्यास, प्रभावी संशोधन लेखन कौशल्य विकसित करण्यास तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रकाशनासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास यावेळी मान्यवर व उपस्थित प्राध्यापकांनी व्यक्त केला.