संशयास्पद हालचालीवर बारीक लक्ष ठेवा : जिल्हाधिकारी अमोल येडगे
schedule27 Jan 26 person by visibility 73 categoryसामाजिक
🔹️जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासमवेत सर्वेक्षण पथकांना भेट, ईव्हीएम स्ट्राँग रूमची पाहणी
कोल्हापूर : जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेसाठी आणि सुरक्षेसाठी पावले उचलली असून, जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांनी शहराच्या सीमेलगत करवीर तालुक्यातील स्थिर सर्वेक्षण पथकांसह रमण मळा येथील ईव्हीएम स्ट्राँग रूमला भेट देऊन सविस्तर पाहणी केली. स्थिर सर्वेक्षण पथकांच्या भेटीदरम्यान त्यांनी प्रत्यक्ष वाहनांच्या तपासणीची कार्यपद्धती पाहिली आणि निवडणूक आयोगाच्या नियमानुसार प्रत्येक संशयास्पद हालचालीवर बारीक लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरजकुमार, परविक्षाधीन पोलीस अधीक्षक आरंक्षा यादव, निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील पवार, तेजस्विनी पाटील आदी उपस्थित होते.
जिल्ह्यामध्ये बेकायदेशीरपणे रोख रक्कम, मद्यसाठा किंवा मतदारांना आमिष दाखवणारी कोणतीही वस्तू शिरणार नाही, याची पूर्ण जबाबदारी या पथकांची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तपासणी दरम्यान सर्व प्रक्रिया कॅमेऱ्यासमोर पार पडली पाहिजे आणि त्यामध्ये कोणतीही त्रुटी राहता कामा नये, अशा सक्त सूचना त्यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या.
यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी रमण मळा येथील ईव्हीएम स्ट्राँग असलेल्या गोदामाची पाहणी केली, जिथे त्यांनी स्ट्राँग रूमच्या त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्थेची बारकाईने तपासणी केली. स्ट्राँग रूमच्या बाहेर तैनात असलेल्या सशस्त्र दलाची उपस्थिती, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे कव्हरेज आणि लॉगबुकची नोंदणी या सर्व बाबी त्यांनी तपासून घेतल्या. ईव्हीएम मशिनची सुरक्षितता ही अत्यंत संवेदनशील बाब असल्याने तिथे चोवीस तास कडक पहारा ठेवण्याचे आदेश त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिले. तसेच पाऊस किंवा इतर नैसर्गिक आपत्ती लक्षात घेऊन स्ट्राँग रूममध्ये ओलावा येणार नाही आणि अग्नीशमन यंत्रणा सज्ज राहील, याची खात्री करण्याचे निर्देश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि निवडणूक शाखेला दिले.
निवडणूक प्रक्रिया निर्भय आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून, कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिला.