नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १२ हजार २६२ कोटींचा निधी वितरीत : मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील
schedule17 Mar 25 person by visibility 320 categoryराज्य

मुंबई : राज्यात विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. या नुकसान भरपाईसाठी यंदाच्या वर्षी आतापर्यंत १२ हजार २६२ कोटींचा निधी वितरीत करण्यात आला आहे. तसेच १३ हजार ३६१ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी आज विधानपरिषदेमध्ये दिली.
सदस्य परिणय फुके यांनी याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री पाटील बोलत होते. यावेळी विरोधीपक्ष नेते आंबादास दानवे, सदस्य प्रविण दरेकर, सदाभाऊ खोत यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला.
मंत्री पाटील म्हणाले की, विभागाच्या शंभर दिवसांच्या नियोजनामध्ये नुकसान भरपाईची रक्कम १०० टक्के वितरीत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. राज्यात अनेक शेतकऱ्यांची बँक खाती ही आधार संलग्न नाहीत, तसेच ई केवायसीही शिल्लक आहेत. यासर्व गोष्टी युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी आधार संलग्न बँक खाती नसलेल्या शेतकऱ्यांची यादी, ई केवायसी नसलेल्या खात्यांची माहिती चावडीच्या ठिकाणी प्रसिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर उर्वरित नुकसान भरपाईचे वितरणही तातडीने करण्यात येईल. कोणत्याही नुकसानग्रस्त शेतकऱ्याची भरपाईची रक्कम शिल्लक राहणार नाही, असेही मंत्री पाटील यांनी सभागृहात सांगितले.