रेनेसां : परिवर्तनाची कृतिशील प्रयोगशाळा
schedule04 Apr 25 person by visibility 305 categoryसामाजिक

एका बाजूला राजकारण्यांच्या पातळीवरून जात आणि धर्मात तेढीचे वातावरण तयार करण्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रयत्न होत असताना, समाजकेंद्री उत्थानाचे उद्दिष्ट नजरेपुढे रेनसां नावाचा प्रकल्प आकार घेऊ पाहतो आहे. त्याविषयी....
२३ मार्च २०२५ रोजी 'सेंटर फॉर रेनेसां' या संशोधन आणि विकास संस्थेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. हेरले, जि. कोल्हापूर या गावी ही संस्था कार्यरत आहे. अशा अनेक संस्था आहेत. कदाचित याहून अधिक सोयी सुविधा असलेल्या आहेत. 'रेनेसां'चे वैशिष्ट्य काय?
'रेनेसां' या शब्दाला महत्त्वाचा ऐतिहासिक संदर्भ आहे. शब्दशः सुद्धा याला अर्थ आहे. पण आमच्या दृष्टीने रेनेसां कृतिशील सामाजिक प्रयोगशाळा आहे. पर्यायी शिक्षण व्यवस्थेचा शोध रेनेसांच्या कार्याचे एक महत्त्वाचे अंग आहे. शिक्षण, प्राप्त करण्यासाठी सर्व बंधने संपावीत. शिक्षण सर्व प्रकारची मानसिक बंदिस्तता तोडणारे आणि खऱ्या अर्थाने मानवाला मुक्त करणारे असावे. यासाठी कोणत्याही प्रस्थापित मार्गाचा पुरस्कार न करता आत्मशोध घ्यायला मदत करणारे असावे. संवेदनशील आणि हृदयात अनुकंपा असलेला माणूस घडावा. अर्थात, शिक्षण नव्या युगात जगण्याला सक्षम करणारे असावेच. यासाठी आम्ही प्रयोगशील आहोत. आम्ही एका नव्या समाजाचे स्वप्न पहातो. ज्यात जात आणि धर्माचे भेद संपतील. स्त्रियांचा सन्मान आणि समानता असेल. जगातून हिंसा आणि युद्धे हद्दपार होतील. प्रेमाच्या आधारे माणसे एकमेकाशी नातेसंबंध स्थिर करतील. पर्यावरण समृद्ध ठेवून विकास होईल. सहकार्य आणि समृद्धीच्या आधारे जगाची व्यवस्था आकार घेईल. भारतात धर्मांची आणि संस्कृतीची विविधता आहे. त्याचा आदर केला जाईल. लोकशाहीचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल.
थोडक्यात, समग्र परिवर्तनासाठी जे जे आवश्यक आहे. त्या सर्व क्षेत्रात संशोधन आणि प्रत्यक्ष कृती करण्यामध्ये रेनेसां आघाडीवर राहील.
▪️आधार जनचळवळीचा
ही संस्था गेल्या ३० एक वर्षापासून कार्यरत असलेल्या 'हिंदी हैं हम' या जन चळवळीतून जन्माला आली आहे. दीड एकर जागा आणि इमारत बांधकामासाठी एक कोटीहून अधिक देणगी जनतेने दिली आहे. विशेष म्हणजे ही संस्था प. महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाच्या पुढाकाराने उभी राहिली. पण या चळवळीत आणि संस्थेच्या उभारणीत मुस्लिमेतर समाजातील कार्यकर्त्यांनी सहभाग केलेला आहे. त्यामुळे याचा उद्घाटन कार्यक्रमसुद्धा अपारंपारिक पद्धतीने वैशिष्ट्यपूर्णरित्या झाला.
उद्घाटनासाठी महाराष्ट्रात शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, शेती आणि सामाजिक सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात व्यक्तिगत तसेच चळवळीत कार्यरत असलेल्या कार्यकत्यांना आमंत्रित केले होते. शिवाय लेखक, पत्रकार, कायदेतज्ज्ञ, संशोधक आणि फिल्म क्षेत्रातील लोकसुद्धा सहभागी झाले होते. या मंडळीमध्ये मुक्त आणि स्नेहसंवाद घडावा असा प्रयत्न होता. झालेल्या चर्चेचे टिपण बनविण्यात येत आहे. हे टिपण सर्वांना वितरित होईल. ही प्रक्रिया नियमितपणे यापुढे पाच वर्षासाठी चालावी अशी अपेक्षा आहे. असा कार्यक्रम करण्याचे कारण काय ?
▪️प्रयोगशीलांचा मेळा
खाजगीकरण, विज्ञान तंत्रज्ञानाचा विकास यामुळे उद्योग व्यवस्थेचे स्वरूप पूर्णतः पालटले आहे. महाराष्ट्रात आता जनचळवळी रोडावल्या आहेत. संपूर्ण राज्यात कष्टकरी जनतेचा आवाज म्हणता येईल, असे नेते वयोवृद्ध झाले किंवा काळाआड गेले आहेत. डाव्या पुरोगामी संघटना आणि पक्ष कमजोर झाले आहेत. त्यामुळे सृजनात्मक आणि रचनात्मक कार्य करू इच्छिणारे लोक आता छोट्या गटात किंवा व्यक्तिगत स्वरूपात काम करताहेत. हे काम महत्त्वाचे आहे. पण परस्पर संपर्क नाही. व्याप्ती नाही. त्यामुळे महाराष्ट्राला दिशा देण्या इतपत परिणाम साध्य होत नाही. आजचे फॅसिस्ट राजकारण महाराष्ट्राच्या सभ्य संस्कृतीवर मोठा हल्ला आहे. हे चिंतेचे सावट आहेच.
अशा स्थितीत, महाराष्ट्रात विविध प्रश्नांवर प्रयोग करणारी आणि रचनात्मक कामात गुंतलेली अनेक माणसे आहेत. कलाकार, लेखक, पत्रकार, संशोधक लोकांची धडपड सुरू आहे. डिजिटल आणि तंत्रवैज्ञानिक क्षेत्रात उच्चशिक्षण घेतलेले अनेक तरूण असे काम करण्यासाठी उत्सुक आहेत. देशभरातील आणि खासकरून महाराष्ट्रातील अशा सर्वांना एकत्र आणण्यासाठी मंच आवश्यक आहे. विषयानुरूप परस्परामध्ये आणि समग्र समज विकसित करण्यासाठी विविध क्षेत्रातील लोकांमध्ये एकत्रितपणे संवाद होणं महत्त्वाचे आहे. या दृष्टीने हा पहिला प्रयत्न खूप यशस्वी झाला. मोठ्या संख्येनी लोक एकत्र आहे.
या बैठकीत विविध विषयावर काम करणारे कार्यकतें, व्यक्ती उपस्थित होते. प्रत्येकजण गंभीरपणे आणि शांतपणे दुसऱ्याचे म्हणणे ऐकून घेत होते. कोणीही आक्रमक वाआग्रही नव्हता. एकमेकाची उणीदुणी काढण्याचा प्रकार नव्हता. प्रत्येकजण सकारात्मकपणे आपला मुद्दा मांडताना दिसला. हा समंजसपणा खूप महत्त्वाचा होता. ही एका प्रक्रियेची सुरूवात आहे. सर्वांना एकत्र गुंफणं आणि प्रत्यक्ष काम पुढे नेणं, हे एक आव्हान आहे. तीन एक महिन्यांनीयाचा आढावा घेऊन हे कार्य पुढे कसे न्यायचे याचा विचार होणार आहे.
शिक्षण, आरोग्य, स्त्रियांचे प्रश्न, शेती, तरूणांसाठी वैज्ञानिक दृष्टी आणि तर्कशुद्ध विवेचक विचार कार्यक्रम, आकाश दर्शन, शिवार फेरी असे विविध विषय प्रत्यक्षात काम सुरू करण्यासाठी निवडलेले आहेत. पर्यायी पत्रकारिता आणि पत्रकांराचे वर्कशॉप घेण्याबाबत विचार झाला आहे. पुढे यात आणखी भर पडू शकते. काही गटांनी यात सहभाग करण्यास उत्सुत्कता दर्शविली आहे. इच्छा असूनही वेळा न जुळल्याने अनेकजण सहभागी होवू शकले नव्हते. त्यामुळे हा विचार आणि कार्यक्रम पुढे जाण्याची संभाव्यता मोठी आहे. या उपक्रमात आणखी लोकांना सहभागी होण्याची इच्छा असल्यास त्यांनी दिलेल्या नंबर किंवा मेलवर जरूर संपर्क करावा.
✍️ हुमायून मुरसल
(लेखक समाज अभ्यासक, कार्यकर्ते आहेत.
▪️ संपर्क : ९१७५४३७५४९
▪️ई-मेल : humayunmursal@gmail.com)
