एमसीएच्या माजी विद्यार्थ्यांचा शिवाजी विद्यापीठात स्नेहमेळावा
schedule08 Jul 25 person by visibility 93 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : माजी विद्यार्थ्यांचे लाभत असणारे प्रेम ही शिवाजी विद्यापीठाची मोठी संपत्ती आहे, असे गौरवोद्गार कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी काढले.
विद्यापीठाच्या संगणकशास्त्र अधिविभागातून सन २०००मध्ये एम.सी.ए. उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा ५ जुलै रोजी स्नेहमेळावा अधिविभागात पार पडला. यावेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी कुलगुरू डॉ. शिर्के यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठाचे कित्येक माजी विद्यार्थी केवळ देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःबरोबरच विद्यापीठाचे नाव चमकवित आहेत. विद्यापीठाप्रती त्यांचे प्रेमही कौतुकास्पद आहे. त्यामुळे माजी विद्यार्थी कॅम्पसवर येत राहणे आणि त्यांचे नव्या पिढीतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभत राहणे, ही बाब महत्त्वाची आहे. यावेळी कुलगुरूंनी गेल्या २५ वर्षांत शिवाजी विद्यापीठाने केलेली प्रगती, विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी राबविण्यात येत असलेल्या नवीन योजना आदींविषयीही उपस्थितांना अवगत केले.
यावेळी या विद्यार्थ्यांना शिकविणारे शिक्षकही उपस्थित होते. यामध्ये अंबुजा साळगावकर, बी.जे. जगदाळे, डॉ. ए.ए. कलगोंडा, सहाय्यक कुलसचिव सुरेश बंडगर हे प्रत्यक्ष तर रट्टीहाळी, श्री. प्रसाद ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहिले. डॉ. स्मिता काटकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. डॉ. कविता ओझा यांनी अधिविभागाच्या वाटचालीविषयी माहिती दिली. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनीही आपल्या बॅचमधील विद्यार्थी सध्या कुठे काम करतात, याविषयी माहिती दिली. डॉ. गायकवाड यांनी आभार मानले.
दुपारच्या सत्रात संगणकशास्त्र अधिविभागाच्या सायबर सिक्युरिटी इमारतीसमोर कुलसचिव डॉ. शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
मेळाव्याला अभिजीत जोगळेकर (सिनिअर टेक्निकल आर्किटेक्ट, एक्सेला टेक्नॉलॉजीज, पुणे), अभिजीत मराठे (प्रिन्सिपल आर्किटेक्ट, टेक्स्ट ग्लोबल, पुणे), चेतन शिंदे (संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी, एक्सपर्ट आयओएस, पुणे), नंदकिशोर जोशी (संचालक, ब्रॉडकॉम पुणे), सुहास मराठे (डिलिव्हरी तज्ज्ञ), गौरी पोतनीस (सोल्युशन आर्किटेक्ट, हिल्टाय, पुणे), संतोष गोरे (सिस्टीम आर्किटेक्ट, इंटेल, बेंगलोर), आशिष घाटे (सिस्टीम प्रोग्रामर, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर), सुजीत जाधव (सिनिअर प्रिन्सिपल इंजिनिअर, डेल, बेंगलोर), शिवाजी गाढवे (असोसिएट डायरेक्टर, एलटीआय माईंडट्री, मुंबई), विद्याधर सावळे (टेक्नॉलॉजी स्पेशालिस्ट, सिनक्रॉन टेक्नॉलॉजीज) आणि सचिन घुगरदरे (प्रोजेक्ट मॅनेजर, कॅपजेमिनी, पुणे) हे माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम पार पाडण्यासाठी संगणक अधिविभागाच्या प्रमुख डॉ. कविता ओझा यांच्यासह शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.