कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांचे कृत्रिम बुद्धिमत्तेवरील पुस्तक उपलब्ध; डॉ. सयाजी हांडे, विनीत गुप्ता, डॉ. सोमनाथ पवार सहलेखक
schedule08 Jul 25 person by visibility 123 categoryसामाजिक

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी तीन महत्त्वाच्या संख्याशास्त्रज्ञांसमवेत लिहीलेले कृत्रिम बुद्धिमत्तेवरील पुस्तक शिवाजी विद्यापीठामार्फत अभ्यासकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे.
‘मॅथेमॅटिक्स बिहाइंड आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग’ असे पुस्तकाचे शीर्षक असून डॉ. शिर्के यांनी डॉ. सयाजी हांडे, विनीत गुप्ता आणि डॉ. सोमनाथ पवार यांच्यासमवेत ते लिहीले आहे. सद्यस्थितीत सर्वाधिक चर्चेत असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि मशीन लर्निंग (एमएल) या विषयांमागील गणिती व सैद्धांतिक पाया समजावून सांगणारे हे पुस्तक अभ्यासकांसाठी उपयुक्त व मार्गदर्शक स्वरुपाचे आहे. शिवाजी विद्यापीठात नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय संख्याशास्त्र परिषदेत मान्यवरांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले होते. आता ते सर्वत्र उपलब्ध झाले आहे.
आजघडीला आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग हे परवलीचे शब्द झाले आहे. अनेकांना ते जादूस्वरुप वाटते. मात्र प्रत्यक्षात या बाबी म्हणजे सशक्त गणिती सिद्धांत व अचूक सूत्रीकरणावर आधारित प्रक्रिया आहेत. त्यामुळे कोणतेही एआय टूल वापरण्यापूर्वी, त्यामागचा विचार, सिद्धांत आणि समस्यांचे गणिती स्वरूप समजून घेणे आवश्यक आहे. या पुस्तकात याच बाबींविषयी सखोल चर्चा, चिंतन आणि मार्गदर्शन करण्यात आले आहे.
‘एआय’ ही संकल्पना केवळ वापरापुरती मर्यादित न राहता, ती कशी कार्य करते, यामागे कोणते गणित असते, याची सखोल माहिती देणारी फार कमी पुस्तके उपलब्ध आहे. हे पुस्तक ती पोकळी भरून काढते. एआय तंत्रज्ञानामध्ये वापरण्यात येणारे महत्त्वाचे अल्गोरिदम आणि त्यामागील गणिती संकल्पना पुस्तकात सुलभ आणि सविस्तर पद्धतीने उलगडून दाखवण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे पुस्तक ‘एआय’मध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांपासून, एआय आणि डेटा सायन्सशी संबंधित अभ्यासक्रम शिकणाऱ्यांसाठी, नवोदित संशोधक, उद्योजक, व्यावसायिक, शिक्षणप्रेमींसह जिज्ञासू वाचकांसाठीही उपयुक्त आहे.
या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे हे पुस्तक उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी एकत्र येऊन लिहिले आहे. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी शिवाजी विद्यापीठातून एम.एस्सी., पीएच.डी. केले असून, अध्यापन व संशोधन क्षेत्रात त्यांचा दांडगा अनुभव आहे. त्यांनी एआय व डेटा अॅनालिटिक्सविषयक अनेक प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या आहेत. डॉ. सयाजी हांडे इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिटयूट, कोलकाता येथून एम.स्टॅट. पदवीधारक असून, परड्यू विद्यापीठ (अमेरिका) येथून त्यांनी पीएच.डी. पूर्ण केली आहे. त्यांना उद्योग क्षेत्रात तीन दशकांहून अधिक अनुभव आहे. त्यांनी आयबीएम, अॅडोब यांसारख्या महत्वपूर्ण संस्थांसह भारत सरकार आणि अमेरिका सरकारसोबतही काम केले आहे. विनीत गुप्ता आयआयटी कानपूर येथून बी.टेक. आणि आयआयएम, अहमदाबाद येथून पदव्युत्तर शिक्षण घेतलेले असून, मेटा (फेसबुक), अॅडोब, अॅडिडास यांसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये एआय क्षेत्रात कार्यरत आहेत. डॉ. सोमनाथ पवार यांनी शिवाजी विद्यापीठातून एम.एस्सी., पीएच.डी. केले असून, गेल्या दशकभरात ते अध्यापन, संशोधन व एआयशी संबंधित प्रकल्प मार्गदर्शनात सक्रिय आहेत.
शिवाजी विद्यापीठाने एआय व डेटा अॅनालिटिक्स या क्षेत्रात अभ्यासक्रम सुरु केले असून, या पुस्तकाच्या माध्यमातून विद्यापीठाचे शैक्षणिक नवोपक्रम अधिक बळकट होतील. विद्यापीठाने केवळ शिक्षणपुरते मर्यादित न राहता, नवीन ज्ञाननिर्मिती व प्रसार करण्याचे महत्त्वाचे काम हाती घेतले आहे. हे पुस्तक सध्या शिवाजी विद्यापीठ कन्झ्युमर्स स्टोअर्स येथे आणि अमेझॉन इंडियावर ऑनलाईन स्वरूपात अत्यंत माफक किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे.