रस्ते,ड्रेनेज लाईनसह प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी आमदार अमल महाडिक यांचा महापालिका अधिकाऱ्यांना शंभर दिवसांचा अल्टिमेटम
schedule11 Dec 24 person by visibility 222 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : शहरात अमृत योजनेअंतर्गत पाईपलाईन आणि ड्रेनेजची कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. तसेच अनेक रस्ते डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. खड्डेमुळे रस्त्यांमुळे शहरभर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच अपुरा पाणीपुरवठा आणि ड्रेनेज लाईन अभावी शहरात विशेषतः उपनगरात अनेक समस्या निर्माण होत आहेत. शहरातील वाढलेली भटक्या कुत्र्यांची संख्या, जागोजागी साचलेले कचऱ्याचे ढीग अशा अनेक प्रश्नांसंदर्भात आमदार अमल महाडिक यांनी महापालिकेत संबंधित विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक घेतली.
या बैठकीला शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीत आमदार महाडिक यांनी अमृत योजनेला वेळोवेळी मुदतवाढ मिळूनही अजून कामे अर्धवट का राहिली? असा सवाल केला. कचरा उठाव आणि मोकाट कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी कोणत्या उपाययोजना केल्या? याचीही माहिती महाडिक यांनी घेतली.
येत्या 100 दिवसात सर्व प्रलंबित कामे मार्गी लावावीत आणि जनतेची गैरसोय दूर करावी अशी सूचनाही महाडिक यांनी केली.
भविष्याचा विचार करून दीर्घकालीन उपाय योजना राबवण्यासाठी महापालिका प्रशासनाने आराखडा बनवावा, शासन स्तरावर निधीसाठी पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन यावेळी आमदार महाडिक यांनी दिले.
24 तारखेला प्रत्येक विभागाची स्वतंत्र बैठक घेऊन कामांचा आढावा घेतला जाईल. प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केल्यानंतर कामात त्रुटी आढळता कामा नयेत असा इशाराही महाडिक यांनी दिला.