महापालिका शाळांमधील सुविधा वाढवण्यासाठी ऍक्शन प्लॅन तयार करा : 'आप'ची बैठकीत मागणी
schedule07 Mar 25 person by visibility 308 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : दिल्लीमध्ये असलेल्या महापालिकेच्या सुसज्ज आणि स्वच्छ शाळांचा पॅटर्न कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये राबववा यासाठी आम आदमी पार्टीने पाठपुरावा सुरु केला आहे. शहरातील महानगरपालिका शाळांची परिस्थिती सुधारावी यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने महापालिका शाळांमध्ये जाऊन भौतिक सुविधांचा सर्वे केला होता. याबाबत तयार झालेल्या अहवालानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांसह 54 शाळांच्या मुख्याध्यापकांसमवेत महिनाभरापूर्वी बैठक पार पडली होती.
बैठकीत ठरल्याप्रमाणे शाळेतील पायाभूत सुविधा, नवीन क्लासरूम, पाण्याची सोय, स्वच्छतागृह, ओपन बार, अतिक्रमण, क्रीडा साहित्य आदी प्रश्नांबाबत मुख्याध्यापकांनी महापालिकेस कळवले होते. या मुद्यांवर आज महापालिका प्रशासन व आप पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. अध्यक्षस्थानी उपायुक्त पंडित पाटील होते.
यावेळी शाळा प्रशासनाधिकारी आर व्ही कांबळे यांनी सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे काम सुरु करण्यात आल्याचे सांगितले. शाळेतील समस्या सोडवण्यासाठी ऍक्शन प्लॅन तयार करावा, त्यासाठी सर्व संबंधित विभागांनी आपली यंत्रणा कार्यान्वित करावी. तसेच स्वच्छता, खरमाती उठाव यासाठी महापालिकेने विशेष मोहीम राबवण्याची मागणी आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केली.
वर्ग दुरुस्ती, नवीन वर्ग , स्वच्छतागृह, कंपाउंड, गेट, पाण्याचे फिल्टर यासाठी लागणाऱ्या निधीच्या तरतुदीची मागणी येत्या बजेटमध्ये करण्यात यावी, ओपन बार बंद करण्यासाठी पोलीसांची मदत घ्यावी, समग्र शिक्षण अभियानातून निधीची मागणी करावी, कामाचा प्राधान्यक्रम ठरवण्यात यावा, महिला व बालकल्याणकडे निधीसाठी प्रस्ताव पाठवावेत अशा मागण्या आप शिष्टमंडळाने केल्या.
यावर उपायुक्त पंडित पाटील यांनी मुख्याध्यापकांकडून आलेल्या मागण्यांचा अभ्यास करून कामाचे नियोजन करून यावर पुढील आठवड्यात बैठक घेणार असल्याचे सांगितले.
यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, अभिजित कांबळे, समिर लतीफ, दुष्यंत माने, विजय हेगडे, संजय नलवडे, उमेश वडर, मयुर भोसले, सहाय्यक प्रकल्प अधिकारी रसूल पाटील, उपशहर अभियंता रमेश कांबळे, सुरेश पाटील, कनिष्ठ अभियंता दत्तात्रय पाटील आदी उपस्थित होते.