SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शक्तिपीठ मोजणी, बेळगावचे कन्नड बोलणे अन् डीलिमिटेशनचा डाव; सतेज पाटलांचा सत्ताधाऱ्यांवर थेट हल्लाबोल!तपोवन मैदानावर ४ ते ७ डिसेंबर २०२६ या कालावधीत सतेज कृषी प्रदर्शनाचे आयोजनजैवविविधतेचा रक्षक: जागतिक जॅग्वार दिनसंजय घोडावत इंटरनॅशनल बोर्डिंग स्कूल व ज्युनि कॉलेजचा वार्षिक क्रीडा महोत्सव २०२६ उत्साहातडिलिमिटेशनवरून महाविकास आघाडीत ठिणगी! पवारांच्या भूमिकेचे मुश्रीफांकडून स्वागत; वडेट्टीवार-राऊतांचा समाचार‘गोकुळ’च्या प्रगतीत प्राथमिक दूध संस्था कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा : चेअरमन राजेश पाटीलविद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे : डॉ. अजितकुमार पाटीलनैतिक मूल्यांची रुजवणूक करणारी ‘दीनीयात ज्ञानस्पर्धा’ जिल्ह्यात उत्साहात; दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभागसरोज पाटील यांना 'पद्मजा पवार प्रेरणा पुरस्कार' जाहीर; शनिवारी वितरण व पुस्तक प्रकाशन सोहळाधैर्यशील भोसलेची जलतरण स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी; ५ सुवर्ण व ४ रौप्य पदकांसह सलग तिसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ट पुरुष जलतरणपटूचा मान

जाहिरात

 

शक्तिपीठ मोजणी, बेळगावचे कन्नड बोलणे अन् डीलिमिटेशनचा डाव; सतेज पाटलांचा सत्ताधाऱ्यांवर थेट हल्लाबोल!

schedule29 Nov 26 person by visibility 192 categoryराजकीय

◼️'चूक कायदा रोखणे हीच आमची जबाबदारी; २०२९ मध्ये देशात परिवर्तन अटळ' — आमदार सतेज पाटलांचा घणाघात

कोल्हापूर: शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी पहाटे पाच वाजता पोलिसांच्या बळावर मागच्या दाराने मोजणीला येण्याऐवजी शासनाने तारीख, गाव आणि वेळ जाहीर करावी; मग आम्ही आमची ताकद दाखवतो, असे थेट आणि खुले आव्हान आमदार सतेज पाटील यांनी सरकार व भाजपला दिले आहे. सीमावाद प्रलंबित असताना मुख्यमंत्र्यांनी बेळगावात कन्नडमध्ये बोलून मराठी जनतेच्या जखमेवर मीठ चोळल्याचा घणाघातही त्यांनी केला असून, मतदारसंघ पुनर्रचनेच्या (डीलिमिटेशन) मुद्द्यावरून केंद्र व राज्य सरकारवर जोरदार प्रहार केला आहे.

शक्तिपीठच्या मोजणीवरून सरकारला थेट आव्हान
शक्तिपीठ महामार्गाला सुरुवातीपासून सातत्याने विरोध करत असल्याचे सांगत सतेज पाटील म्हणाले की, पूर्वी भाजप नेते केवळ नेत्यांचा विरोध असून लोकांचा विरोध नाही, असा दावा करत होते. मात्र, गेल्या दहा दिवसांत शेतकरी रस्त्यावर उतरल्यानंतर या प्रकल्पाला शेतकऱ्यांचाही तीव्र विरोध असल्याचे स्पष्ट झाले आहे. या आंदोलनात आपण आणि राजू शेट्टी ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून, जिथे मोजणी होईल तिथे कार्यकर्ते विरोध करतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

अचानक पहाटे पाच वाजता मोजणीसाठी येण्याच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवत पाटील म्हणाले की, अनेकदा कळतही नाही आणि आम्ही पोहोचण्यापूर्वीच स्थानिक लोक मोजणी पथकाला हाकलून देतात. गावे आणि अलाईमेंट प्रशासनाला माहित असताना मागच्या दाराने व पोलिसांचे बळ घेऊन न येता, पुढच्या पाच दिवसांनंतरची किंवा ठराविक तारखेची (उदा. ५ किंवा १० डिसेंबर) तारीख, गाव आणि वेळ जाहीर करावी, असे आव्हान त्यांनी दिले.

बेळगावात कन्नड बोलणे म्हणजे मराठी जनतेच्या जखमेवर मीठ
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना, मुख्यमंत्र्यांनी बेळगावमध्ये जाऊन प्रथम कन्नड भाषेत बोलणे अत्यंत दुर्दैवी असून यातून सीमाभागातील मराठी जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम झाले आहे, अशी टीका सतेज पाटील यांनी केली. न्यायालयात खटला सुरू असताना तिथे मराठी भाषिकांवरील अन्यायाविरोधात भूमिका मांडणे अपेक्षित होते. एका बाजूला शासन चांगले वकील देण्याची भाषा करते आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांची कृती वेगळी दिसते, असा टोला त्यांनी लगावला.
डीलिमिटेशन, महिला आरक्षण आणि लोकशाहीचे रक्षण
चुकीचा कायदा रोखणे आणि लोकशाही व मतदानाचा अधिकार टिकवणे ही काँग्रेसची जबाबदारी असल्याचे पाटील म्हणाले. राहुल गांधी यांच्या भूमिकेचा संदर्भ देत 'व्होट चोरी'सारखे विषय समोर येत असून दिलेले मत कुठे जाते हे कळत नसेल, तर ही व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.

सध्या राज्यात २८८ आमदार असताना निधीसाठी भांडामंडी सुरू आहे आणि जिल्हा परिषदेचा निधी काढून घ्यायची वेळ येत आहे. अशा वेळी आमदार व खासदारांची संख्या ४०० ते साडेचारशेपर्यंत नेऊन संस्थात्मक महत्त्व आणि लोकप्रतिनिधींची प्रतिष्ठा कमी करण्याचा भाजपचा डाव आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मात्र, २०२९ मध्ये मतदार याला हाणून पाडतील आणि देशात परिवर्तन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महागाई, बेरोजगारी आणि एमएसएमईवर परिणाम
देशात 'भाजप विरुद्ध देश' असे वातावरण निर्माण झाल्याचा दावा करत सतेज पाटील म्हणाले की, बेरोजगारी, महागाई, परराष्ट्र धोरण, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी लादलेला टॅरिफ आणि एच-१बी व्हिसाच्या समस्या असे अनेक प्रश्न उभे आहेत. 'सीआयआय'च्या परिषदेत पंतप्रधानांनी रोजगार निर्मितीबाबत विचारलेल्या प्रश्नावर उद्योगपतींनी दिलेल्या उत्तराचा दाखला देत, एमएसएमई आणि लघुउद्योग कमकुवत झाल्याचा आरोप त्यांनी केला. २०२९ मध्ये या सर्व बाबींचा हिशेब होईल, असे ते म्हणाले.

महिला आरक्षणावरूनही त्यांनी मुख्यमंत्र्यांना धारेवर धरले. २०२३ मध्ये कायदा मंजूर होताना काँग्रेस व इंडिया आघाडीने एकमताने पाठिंबा दिला होता; मग २०२४ मध्ये ३३ टक्के महिला आरक्षण का लागू केले नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला. भाजपचा मूळ उद्देश महिला आरक्षण नसून केवळ डीलिमिटेशन करणे हाच आहे; तर एससी, एसटी आणि महिला आरक्षणाबाबत सरकार स्पष्ट उत्तरे देण्यापासून पळ काढत असून वेगळा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केला.

◼️'हिम्मत असेल तर आबिटकरांच्या घरावर मोर्चा घेऊन जावा'; के. पी. पाटलांना सतेज पाटलांचे खुले आव्हान
 सत्ताधारी गटातील नेत्यांची भूमिका आत एक आणि बाहेर एक अशी आहे. के. पी. पाटील यांच्यात हिम्मत व दम असेल, तर त्यांनी थेट सत्तेत बसलेल्या उपमुख्यमंत्र्यांसमोर बोलावे आणि केवळ पत्रकबाजी न करता उद्या सकाळी (प्रकाश) आबिटकरांच्या घरावर मोर्चा घेऊन जावा, असे थेट आव्हान आमदार सतेज पाटील यांनी दिले आहे .
​प्रतिक्रिया व्यक्त करताना सतेज पाटील यांनी सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली  ते म्हणाले की, संबंधित तिघेही नेते सत्तेत आहेत. तिथे जाऊन त्यांनी थेट बोलावे आणि सत्तेची ताकद वापरून ते थांबवावे. केवळ पत्रके काढून, बोलून आणि 'टीआरपी' मिळवण्याचे काम चालणार नाही, असे त्यांनी ठणकावले .
​के. पी. पाटील यांना उद्देशून सतेज पाटील म्हणाले की, केवळ प्रसिद्धीसाठी घोषणा देऊ नका; हिम्मत असेल तर रस्त्यावर उतरा आणि उद्या सकाळी त्यांच्या घरावर मोर्चा काढा. असे केल्यास तुम्ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या बरोबर आहात, हे आम्हाला दिसून येईल, असे त्यांनी स्पष्ट केले

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes