संजय घोडावत इंटरनॅशनल बोर्डिंग स्कूल व ज्युनि कॉलेजचा वार्षिक क्रीडा महोत्सव २०२६ उत्साहात
schedule28 Nov 26 person by visibility 176 categoryक्रीडा
अतिग्रे : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई बोर्डिंग स्कुल व ज्युनि कॉलेज यांचा वार्षिक क्रीडा महोत्सव २०२६ मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाला. संजय घोडावत स्टेडियमवर या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी यशवंत इंटरनॅशनल स्कूल, वारणा कोडोलीचे प्राचार्य मंदार पसरणीकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच प्रशांत पाटील सल्लागार कमिटी मेंबर यशवंत इंटरनॅशनल स्कूल हे ही यावेळी उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या संचालिका व प्राचार्या सस्मिता मोहंती होत्या. यावेळी बोर्डिंगचे प्राचार्य डॉ एच एम नवीन व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य नितेश नाडे, शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात क्रीडाध्वज पूजन, ज्योत प्रज्वलन आणि शिस्तबद्ध संचलनाने झाली. विद्यार्थ्यांनी विविध खेळांचे प्रतिनिधित्व करणारे आकर्षक संचलन सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
क्रीडा महोत्सवात १०० मीटर, २०० मीटर, 400 मीटर व १००० मीटर धावणे, रिले, गोळाफेक, थाळीफेक आणि भालाफेक, फुटबॉल, बास्केटबॉल, हॉकी अशा विविध मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. अग्नी, त्रिशूल, पृथ्वी आणि आकाश या चार हाऊसमधील विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपले क्रीडाकौशल्य, जिद्द आणि खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवले.
यावेळी प्रमुख पाहुणे मंदार पसरणीकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, खेळामुळे शिस्त, सांघिक भावना, जिद्द आणि आत्मविश्वास या गुणांचा विकास होतो. अभ्यासाइतकेच खेळालाही जीवनात महत्त्व असून विद्यार्थ्यांनी खिलाडूवृत्ती जोपासत जीवनात यश संपादन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना संचालिका व प्राचार्या सौ. सस्मिता मोहंती यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. त्या म्हणाल्या की, संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळतो, तसेच त्यांच्यात आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि सांघिक भावना विकसित होते.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी विविध क्रीडा स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदके व प्रमाणपत्रे प्रदान करून गौरविण्यात आले.