कोल्हापूर : अधिकृत फेरीवाल्यांसाठी विशेष कॅम्पला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद
schedule06 Oct 26 person by visibility 152 categoryमहानगरपालिका
⚫ पहिल्या दिवशी ६३८ अर्जांचे वितरण; २७७ फेरीवाल्यांकडून कागदपत्रांसह अर्ज दाखल
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अधिकृत फेरीवाल्यांना क्यूआर कोड देण्यासाठी चारही विभागीय कार्यालयांमध्ये तीन दिवसीय विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. या कॅम्पला पहिल्याच दिवशी फेरीवाल्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आज पहिल्या दिवशी एकूण ६३८ अर्जांचे वितरण करण्यात आले असून, २७७ फेरीवाल्यांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर केले आहेत.
विभागीय कार्यालय क्र. १ मार्फत १५८ अर्जांचे वितरण करण्यात आले. विभागीय कार्यालय क्र. २ मार्फत २४५ अर्जांचे वितरण करण्यात आले असून त्यापैकी १४५ अर्ज प्राप्त झाले आहेत. विभागीय कार्यालय क्र. ३ मार्फत १०९ अर्जांचे वितरण व ४९ अर्ज प्राप्त झाले आहेत. तसेच विभागीय कार्यालय क्र. ४ मार्फत १२६ अर्जांचे वितरण करण्यात आले असून ८३ अर्ज प्राप्त झाले आहेत. या विशेष कॅम्पमध्ये बुधवार दि. ७ ऑक्टोबर २०२६ तसेच अंतिम दिनांक गुरुवार दि. ८ ऑक्टोबर २०२६ अखेर संबंधित प्रभाग क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे शहरातील पात्र फेरीवाल्यांनी निर्धारित मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
प्राप्त अर्जांची छाननी करून सादर केलेल्या पुराव्यांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर पात्र व्यवसाय धारकांकडून नोंदणीसाठी रु. १,००० शुल्क तसेच प्रत्येक दिवसासाठी रु. १०० शुल्क आकारण्यात येणार आहे. क्यूआर कोडमध्ये संबंधित फेरीवाल्याचे व्यवसायाचे ठिकाण, कार्ड धारकाचे नाव, फेरीवाला कार्ड क्रमांक आदी माहिती उपलब्ध राहणार आहे. संबंधित व्यवसायधारकांनी हा क्यूआर कोड आपल्या हातगाडीवर दर्शनी भागात लावणे बंधनकारक राहणार आहे.
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकामार्फत कारवाई करताना संबंधित क्यूआर कोड स्कॅन करून फेरीवाला अधिकृत आहे किंवा नाही, याची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यामुळे क्यूआर कोडधारक अधिकृत फेरीवाल्यांनाच संबंधित ठिकाणी व्यवसाय करता येणार असून, अनधिकृत व्यवसायावर महापालिकेच्या नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.