शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला करवीरमध्ये तीव्र विरोध; शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा
schedule09 Sep 26 person by visibility 140 categoryराज्य
करवीर: करवीर तालुक्यातील हसूर दुमाळा येथे शक्तीपीठ महामार्गासाठी होणाऱ्या नियोजित जमीन मोजणीला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. मोजणीसाठी येणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना चोप दिल्याशिवाय सोडणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी दिला आहे. हसूर दुमाळा गावात आयोजित मोजणीच्या ठिकाणी उपस्थित राहून शेट्टी यांनी शक्तीपीठ महामार्गाविरोधात आक्रमक भूमिका घेतली तसेच या महामार्गाच्या नोटिसाही जाळून टाकण्यात आल्या आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गाला सर्वाधिक विरोध होत असतानाच, आज सकाळपासूनच शेतकरी हातामध्ये उसाचे दांडके घेऊन मोजणीच्या विरोधात रस्त्यावर उतरले. महामार्गाच्या नोटिसा अद्याप महसूल खात्याने काढल्या नसल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात मोजणी अधिकारी आल्यास त्यांना जाब विचारला जाईल आणि शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न केल्यास अजिबात दयामाया दाखवली जाणार नाही, असा इशारा नेत्यांनी दिला .
शेतकरी संघटनेच्या या आक्रमक आंदोलनामुळे प्रशासनाने आजचा मोजणीचा निर्णय रद्द केला. या आंदोलनात शक्तीपीठ महामार्ग विरोधी समिती नेत्यांसह शेतकरी सहभागी झाले होते.