कर्नाटक सीमाभागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत सहभागासाठी संधी देणार : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
schedule17 Mar 25 person by visibility 299 categoryराज्य

मुंबई : कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून या भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होण्याची संधी राज्य शासन उपलब्ध करून देत असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेमध्ये दिली.
सदस्य निरंजन डावखरे यांनी याविषयी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महसूल मंत्री बावनकुळे बोलत होते. यावेळी सदस्य प्रवीण दरेकर यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला.
कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र, कौशल्य विकास केंद्र उभारणार असल्याचे सांगून मंत्री बावनकुळे म्हणाले की, राज्यशासन या सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे. त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्यांना लागणारे सर्व प्रशिक्षण देण्याची शासनाची भूमिका आहे. तसेच राज्यातील तलाठी भरतीमध्ये कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी देण्यात आली होती. सुमारे ३९१ उमेदवारांनी तलाठी पदभरती परीक्षा २०२३ साठी अर्ज भरल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.