राज्यघटनेमुळे देशातील कोणत्याही व्यक्तीला सर्वोच्च पदाची संधी : सरन्यायाधीश भूषण गवई
schedule08 Jul 25 person by visibility 124 categoryराज्य

▪️मराठी माणूस सर्वोच्चपदी पोहोचल्याचा सार्थ अभिमान- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
▪️सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधीमंडळात गौरव
मुंबई : भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश असून भारतीय राज्यघटना अद्वितीय आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या सक्षम राज्यघटनेमुळे देशातील कोणतीही व्यक्ती सर्वोच्च पदावर पोहोचू शकते, ही राज्यघटनेची ताकद असल्याचे प्रतिपादन भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले.
विधानमंडळाच्या वतीने आयोजित सत्काराला उत्तर देताना भारताची राज्यघटना या विषयावर सरन्यायाधीश गवई बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह मंत्रीमंडळातील सर्व मंत्रीगण, दोन्ही सभागृहाचे सदस्य उपस्थित होते.
राज्यघटनेचा इतिहास सांगून सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले की, एक देश आणि सर्वसमावेशक एकाच राज्यघटनेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ठाम भूमिका घेतली. यामुळेच जात, धर्म बाजूला ठेवत न्यायदानात आणि सर्व बाबतीत देश एकसंध राहण्यास मदत मिळाली आहे. देशाने राज्यघटनेचा अमृत महोत्सवी कार्यकाल पूर्ण केला आहे. गेल्या ७५ वर्षांच्या कालखंडामध्ये कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळाने राज्यघटनेला अभिप्रेत काम केले आहे. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय समान न्याय राज्यघटनेमुळेच सर्वांना मिळाला.
महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यामुळे महिलांना शिक्षणाचे दालन खुले झाले. यामुळे महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत. पंतप्रधान, राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष या देशाच्या सर्वोच्च पदावर महिला राज्यघटनेच्या समानतेमुळेच पोहोचल्या. आदिवासी, अनुसूचित जाती-जमाती या घटकातील नागरिकांनाही राज्यघटनेमुळे उच्च पदावर विराजमान होता आल्याचे सरन्यायाधीश गवई यांनी सांगितले. उपेक्षित, वंचित, शोषित, पिडीत समाजासाठी समान न्याय देण्याचे काम पार पाडता आल्याबद्दल त्यांनी राज्यघटनेच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
▪️मराठी माणूस सर्वोच्चपदी पोहोचल्याचा सार्थ अभिमान - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्राचे सुपुत्र भारताचे सरन्यायाधीश झाले. महाराष्ट्राचा मराठी माणूस भारताच्या सर्वोच्चपदी पोहोचल्याने राज्याला सार्थ अभिमान असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मानवता आणि संवेदनशीलता हा सरन्यायाधीश श्री. गवई यांच्या स्वभावातील महत्वाचा गुण आहे. राज्यात न्यायाधीश असताना त्यांनी विविध महत्वाच्या संदर्भात व्यापक जनहित पाहून न्यायदानाचे काम करून मार्ग काढण्यावर भर दिला. नागपूरमधील झोपडपट्टी तोडण्याच्या वेळीही त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जावून त्यावर तोडगा काढून स्थगिती मिळवून दिली. अतिशय सामान्य माणूस असा असामान्य होऊ शकतो, हे सरन्यायाधीश श्री. गवई यांनी दाखवून दिले आहे. आमदार निवासात असताना ते जनतेच्या राहण्याची व्यवस्था करून स्वत: व्हरांड्यात बसून अभ्यास करीत. मात्र त्यांनी अभ्यासामध्ये खंड पडू दिला नाही.
टायगर कॉरिडॉरच्यावेळी रस्त्याची अनेक कामे अडलेली होती, मात्र सरन्यायाधीश गवई यांनी यावर समिती नेमून मानवतेचा दृष्टिकोन, व्यापक जनहित समोर ठेवून न्यायदान केले. यामुळे अडलेली कामे पूर्ण होऊ शकली, अशी आठवण मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितली. सरन्यायाधीश गवई हे समन्वय आणि चर्चेतून प्रत्येक विषयावर मार्ग काढतात. देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षात त्यांच्या न्यायदानाच्या कार्याची इतिहासात दखल घेतली जाईल, अशा शुभेच्छा मुख्यमंत्री फडणीस यांनी दिल्या.