शिरोळ तालुक्यातील जैनापूर परिसरात 28.40 लाखांची अनधिकृत खते जप्त
schedule28 Nov 25 person by visibility 53 categoryराज्य
कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील जैनापूर परिसरात विना परवाना अनधिकृतरित्या खते उत्पादन व विक्री करणाऱ्या केंद्रावर कृषी विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकून 28 लाख 40 हजार 750 किंमतीची रासायनिक खते जप्त केली.
कृषी विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई बसवराज मस्तोळी, विभागीय कृषि सहसंचालक, जालिंदर पांगरे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नामदेव परिट कृषि उपसंचालक, प्रल्हाद साळुंखे, तंत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा भरारी पथकाने केली. ही कारवाई जिल्हा भरारी पथकाचे प्रमुख राजेंद्र माने, कृषी विकास अधिकारी, जि.प. यांच्या नेतृत्वाखाली सुशांत लव्हटे, मोहीम अधिकारी, जि.प., संभाजी शेणवे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, नंदकुमार मिसाळ, कृषि अधिकारी, गुण नियंत्रण, हातकलंगले व अनुप रासकर, कृषि अधिकारी, गुण नियंत्रण निरीक्षक, शिरोळ यांनी संयुक्तपणे केली.
श्रीकृष्ण प्रभाकर पटवर्धन यांच्या मालकीच्या गट क्र. 166 मधील गोडाऊनमध्ये धाड टाकल्यावर सेंचुरी ॲग्रो केमिकल्स, हडपसर, पुणे-13 या नावाने 15 प्रकारची खतसदृश उत्पादने मोठ्या प्रमाणात साठवलेली आढळली. तपासणीवेळी उपस्थित आरोपी अनय प्रशांत घुणागे (वय 21, रा. हडपसर पुणे) याच्याकडे उत्पादन परवाना, विक्री परवाना किंवा कोणतेही अधिकृत दस्तऐवज उपलब्ध नव्हते. पटवर्धन यांच्या जागेत भाडे करारपत्राद्वारे अनय प्रशांत घुणागे विना परवाना अनधिकृतरित्या खते उत्पादन व विक्री करत होते. या प्रकरणात अनुप रासकर, कृषि अधिकारी, गुण नियंत्रण, शिरोळ यांनी तक्रार नोंदवली असून पुढील तपास सुरु आहे. आनंदराव हंबर यांनी पंच म्हणून काम पाहिले.