माध्यमांमधील आक्षेपार्ह बातम्यांवर लक्ष ठेवा : निवडणुक निरीक्षक (पोलीस) अर्णब घोष
schedule02 Nov 24 person by visibility 241 categoryराज्य
▪️ माध्यम व तक्रार निवारण कक्षाला दिली भेट
कोल्हापूर : विधानसभा निवडणूक कालावधीत प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियावर प्रसिध्द होणाऱ्या आक्षेपार्ह बातम्या व मजकूरावर लक्ष ठेवा, अशा सूचना कोल्हापूर जिल्ह्यासाठी नियुक्त निवडणुक निरीक्षक (पोलीस) अर्णब घोष यांनी दिल्या.
घोष यांनी आज माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती, मीडिया कक्ष, तक्रार निवारण व मतदार मदत कक्ष तसेच सी-व्हिजील कक्षाला भेट देऊन येथील कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा तक्रार निवारण व मतदार मदत कक्षाचे नोडल अधिकारी अरुण भिंगारदेवे, जीएसटी विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा सी- व्हिजील कक्षाचे नोडल अधिकारी बाळकृष्ण खणदाळे, तसेच माहिती अधिकारी तथा मीडिया कक्षाच्या सहाय्यक नोडल अधिकारी वृषाली पाटील, रणजित पवार तसेच अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
घोष म्हणाले, विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन प्रसिध्द करण्यात येणाऱ्या मजकूरावर तसेच पेड न्यूज, आक्षेपार्ह, चुकीच्या व अफवा पसरवणाऱ्या बातम्यांवर लक्ष ठेवा. उमेदवारांच्या प्रत्येक सोशल मीडिया अकाउंटची वेळोवेळी तपासणी करा. ईव्हीएम मशीनच्या विश्वासार्हतेबाबत शंका निर्माण करणाऱ्या बातम्या प्रसिद्ध झाल्यास संबंधितांना तात्काळ नोटीस द्या, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
आचारसंहिता भंगाच्या तक्रारी सी- व्हिजील ॲपवर दाखल झाल्यास त्यावर तात्काळ कार्यवाही करा. तसेच तक्रार दाखल करणाऱ्या व्यक्तीच्या शंकेचे निरसन झाल्याची खात्री करा, असे सांगून निवडणूकीशी संबंधित तक्रार व मदत मागितलेल्या व्यक्तींचीही तक्रार निरसन झाल्याची शहानिशा करा, असे त्यांनी सांगितले. यावेळी संबंधित विभागाच्या नोडल व सहाय्यक नोडल अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागाशी संबंधित माहिती पोलीस ऑब्झर्व्हर घोष यांना दिली.