अंबप येथे तिघांकडून युवकाचा खून
schedule03 Dec 24 person by visibility 216 categoryगुन्हे
पेठवडगाव : अंबप (ता. हातकणंगले) येथे यश किरण दाभाडे (रा. अंबप) या १९ वर्षीय युवकाचा अज्ञात तीन तरुणांनी धारदार शस्त्राने वार करून खून केला. सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. पूर्ववैमनस्यातून खून झाला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
यश दाभाडे सोमवारी सायंकाळी अंबप ते अंबप फाटा येथील पाण्याच्या टाकीजवळ बसलेला होता. दरम्यान, सातच्या सुमारास मोटारसायकलवरून तीन तरुण अचानक आले. त्यांनी बेसावध असलेल्या यशवर कोयत्याने सपासप वार करून महामार्गाच्या दिशेने ते पळून गेले. डोक्यात वर्मी घाव बसल्याने यशचा जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. दरम्यान, पेठवडगावचे पोलिस निरीक्षक विलास भोसले, सहायक पोलिस निरीक्षक कैलास कोडक, संजय माने, उपनिरीक्षक संतोष माने यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पंचनामा करून पारगाव येथे मृतदेह विच्छेदनासा पाठवण्यात आला. संशयितांच शोधासाठी पथके रवाना झाली आहेत.
यश दाभाडे यावर १० सप्टेंबर २०२३ ला शालेय वादातून तरुणावर चाकू हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. तो अल्पवयीन असल्यामुळे त्याला सुधारगृहात ठेवण्यात आले होते. या प्रकरणातून खून झाला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे.