एम.बी.ए.च्या विद्यार्थ्यांकडून सामाजिक बांधिलकीची ‘चेतना’
schedule16 Oct 25 person by visibility 130 categoryसामाजिक

* विशेष विद्यार्थ्यांनी दिवाळीसाठी बनविलेल्या ८० हजार रुपयांहून अधिक वस्तूंची विक्री
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या एम.बी.ए. विभागाने सामाजिक बांधिलकी जपत दिवाळीनिमित्त ‘चेतना’ अपंगमती विकास संस्थेच्या विद्यार्थ्यांसोबत एक अनोखा उपक्रम राबविला. या उपक्रमांतर्गत संस्थेच्या विशेष विद्यार्थ्यांनी चेतना व्यवसाय प्रशिक्षण उत्पादन केंद्रात दिवाळीसाठी बनविलेल्या सुमारे ८० हजार रुपयांहून अधिक किंमतीच्या विविध वस्तू एम.बी.ए.च्या विद्यार्थ्यांनी अवघ्या चारच दिवसांत विकल्या.
‘चेतना’ संस्थेमध्ये सध्या २२० विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यांच्यासाठी शैक्षणिक व पुनर्वसनात्मक उपक्रम राबवले जातात. ‘चेतना’ संस्थेच्या विशेष विद्यार्थ्यांनी दिवाळीसाठी तयार केलेल्या विविध वस्तूंमध्ये गिफ्ट बॉक्स, आकर्षक पणत्या, धुप-अगरबत्ती, लक्ष्मीपूजन पुडा, आकाशकंदील, अभ्यंगस्नानासाठी उटणे, साबण, सुवासिक तेल यांचा समावेश होता. एमबीए विभागाच्या विद्यार्थ्यांनी आपली विपणन व विक्री कौशल्ये पणाला लावत १३ ते १६ ऑक्टोबर या चार दिवसांच्या कालावधीत या वस्तूंची ठिकठिकाणी विक्री केली. शिवाजी विद्यापीठाच्या ‘शिवबाजार’सह विविध अधिविभाग, दूरशिक्षण केंद्र, एन.सी.सी. गेट, रसायनशास्त्र विभाग, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि गांधीनगर येथे स्टॉल लावून तसेच वाहनातून विक्री करण्यात आली. या उपक्रमाला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद लाभला.
‘चेतना’च्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि विशेष विद्यार्थ्यांच्या कार्यकौशल्यांना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश होता. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यवस्थापन, विपणन, आणि ग्राहक संवाद कौशल्यांचा प्रत्यक्ष वापर करता आला. विद्यार्थ्यांनी प्रभावी विक्रीसाठी व्यावसायिक पद्धतीने योजना आखली आणि डिजिटल मार्केटिंगचा प्रभावी वापर केला. त्यामुळे अत्यल्प कालावधीत अपेक्षेपेक्षा अधिक विक्री झाली.
या उपक्रमाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्यासह कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, डॉ. संतोष चौगुले यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनीही कौतुक केले. ॲस्टर आधार हॉस्पिटलसह विद्यापीठातील अधिकारी आणि शिक्षक यांनी विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी ठेवलेल्या वस्तू खरेदी केल्या आणि विद्यार्थ्यांच्या उपक्रमशीलतेचे व सामाजिक बांधिलकीचे विशेष कौतुक केले. एम.बी.ए. विभागाच्या संचालक डॉ. दीपा इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला डॉ. तेजश्री घोडके, जयश्री लोखंडे, स्मिता कांबळे आणि अनिता पाटील यांचे सहकार्य लाभले.