धरणफुटीचा धोका ओळखणाऱ्या यंत्रणेला जर्मन पेटंट मंजूर; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांचे अभिनव संशोधन
schedule16 Oct 25 person by visibility 144 categoryराज्य

शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल अधिविभागातील संशोधक शुभम तानाजी गिरीगोसावी, भूगोल अधिविभाग प्रमुख डॉ. सचिन पन्हाळकर, इचलकरंजीच्या दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालयातील प्रा. परेश मट्टीकल्ली, सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागातील डॉ. गणेश सुनील न्हिवेकर आणि विद्यापीठाच्या नॅनो विज्ञान व तंत्रज्ञान स्कूलचे डॉ. तुकाराम डोंगळे यांनी या संदर्भातील संशोधन केले. या संशोधकांनी ‘अॅन इंटिग्रेटेड सिस्टीम फॉर दि डिटेक्शन ऑफ डॅम ब्रिचेस, अर्ली वॉर्निंग अँड इव्हॅक्युएशन असिस्टंन्स’ या शीर्षकाने आपले अभिनव संशोधन केले. या अत्याधुनिक प्रणालीद्वारे धरण फुटीचा धोका लवकर ओळखता येतो. त्याद्वारे नागरिकांना तात्काळ इशारा देणे आणि नागरिकांच्या सुरक्षित स्थलांतरास मदत करणे या बाबी तातडीने करता येऊ शकतात. या तंत्रज्ञानामुळे भविष्यात धरणभंग आणि पूर आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे. या संशोधनाला जर्मन सरकारकडून पेटंट मंजूर झाले आहे.
प्रकल्प संशोधक शुभम गिरीगोसावी यांनी या मॉडेलचे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रात्यक्षिक सादर केले असून या अभिनव प्रणालीला विविध तज्ज्ञ संस्थांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या कार्यासाठी त्यांना दोन राष्ट्रीय आणि एक आंतरराष्ट्रीय असे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.
या संशोधकांचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.