विद्यापीठात फूड बिझनेस जागृती कार्यशाळा उत्साहात
schedule16 Oct 25 person by visibility 131 categoryसामाजिक
कोल्हापूर : जागतिक अन्न दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या अन्न विज्ञान व तंत्रज्ञान अधिविभागातर्फे विद्यापीठातील विद्यार्थी आणि परिसरातील फूड बिजनेस ऑपरेटर यांच्यासाठी मार्गदर्शन तथा जागृतीपर कार्यशाळा आज उत्साहात झाली. अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. विलास शिंदे होते.
कार्यशाळेत अन्न सुरक्षा व आरोग्य यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सूक्ष्मजीवशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. पी.के. पवार यांनी सदर कार्यशाळा अत्यंत कालोचित असल्याचे सांगितले. अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त यु.एस. लोहकरे यांनी सध्या नफेखोरीसाठी केली जाणारी भेसळ व ती भेसळ सहजरीत्या कशी ओळखावी, हे सांगितले.
त्याचप्रमाणे फोस्टॅग ट्रेनिंग, इट राईट कॅम्पस आणि लेबलिंग ऍक्ट याविषयही मार्गदर्शन केले. अन्न व औषध प्रशासनाच्या कोल्हापूर विभागाचे अन्नसुरक्षा अधिकारी विजय पाचपुते यांनी एफएसआय परवाना व एफडीएच्या कामकाजाची तपशीलवार माहिती दिली.
अन्नशास्त्र व तंत्रज्ञान अधिविभागाच्या एम. एस्सी. भाग दोनच्या विद्यार्थिनींनी एडिबल ऑइलवर माहितीपूर्ण सादरीकरण केले. शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. शिंदे यांनी सद्यपरिस्थितीचे विवेचन करीत असताना अन्न पदार्थांची नैसर्गिकता व लुप्त होत असलेली नैसर्गिक चव तसेच लोकांची अन्नपदार्थाविषयी बदलती संकल्पना याविषयी खंत व्यक्त केली. अन्नविज्ञानाच्या विद्यार्थ्यांची शाश्वत अन्नप्रणालीमध्ये भविष्यात मोठी भूमिका असणार आहे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागप्रमुख डॉ. प्रवीणकुमार पाटील यांनी केले. डॉ. अभिजीत गाताडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन केले. दोन दिवसांत झालेल्या कार्यक्रमांचा आढावा डॉ. हर्षवर्धन कांबळे यांनी सादर केला. डॉ. अश्विनी देशमुख यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी हर्षद कांबळे, वैभव बागे यांचे सहकार्य लाभले.