डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. ए. के. गुप्ता
schedule30 Oct 25 person by visibility 145 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे नवे कुलगुरू म्हणून डॉ. ए. के. गुप्ता यांची नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी केली. डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त ऋतुराज पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. के. प्रथापन यांचा कार्यकाल समाप्त झाल्याने त्यांच्या जागी डॉ. ए. के. गुप्ता यांची कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली. विद्यापीठात झालेल्या विशेष कार्यक्रमात नव्या कुलगुरुंनी सूत्रे स्वीकारली. कुलगुरू निवडीसाठी राबवलेल्या प्रक्रियेमध्ये देशभरातील १५८ जणांचे अर्ज प्राप्त झाले होते. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांनुसार गठीत केलेल्या त्रिसदस्यीय समितीकडून त्यातील १६ जणांच्या मुलाखती घेऊन ४ उमेदवारांची नावे अंतिम निवडीसाठी कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्याकडे सादर करण्यात आली होती. यामधून डॉ. गुप्ता यांची कुलगुरूपदी निवड करण्यात आली आहे.
डॉ. ए. के. गुप्ता हे २०१७ पासून डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत असून उत्तम प्रशासक व प्राध्यापक म्हणून त्यांची ओळख आहे. तीन दशकांहून अधिक काळ उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्रात ते कार्यरत असून आउटकम बेस्ड एज्युकेशन, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी २०२०ची अंमलबजावणी, तसेच गुणवत्तावर्धनासाठी विविध शैक्षणिक सुधारणा त्यांनी प्रभावीपणे राबवल्या आहेत. डॉ. गुप्ता यांना तब्बल ११ वेळा बेस्ट टीचर अवार्ड मिळाला आहे. त्यांनी ९० हून अधिक संशोधन निबंध प्रकाशित केले, ५७ पदव्युत्तर व ४ पीएच.डी. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. विविध विद्यापीठांच्या अभ्यासमंडळाचे सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत.
कुलपती डॉ. संजय डी. पाटील आणि विश्वस्त ऋतुराज पाटील यांच्या हस्ते डॉ. गुप्ता यांना कुलगुरूपदी नियुक्तीचे पत्र देण्यात आले. डॉ. पाटील यानी डॉ. गुप्ता यांचे अभिनंदन करत त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठ आणखी नव्या उंचीवर पोहचेल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. जे. ए खोत, रिसर्च डायरेक्टर डॉ. पी. एस. पाटील, अभिमत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, डॉ. शिंपा शर्मा, सीएचआरओ श्रीलेखा साटम, डॉ. अभय जोशी, डॉ. गुरुनाथ मोटे, डॉ. एस. बी. पाटील, डॉ. महादेव नरके, डॉ. संतोष चेडे, डॉ. सदानंद सबनीस यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, रजिस्ट्रार, विभागप्रमुख उपस्थित होते.