“सरदार@१५० एकता पदयात्रा” उपक्रमासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन बैठक
schedule29 Oct 25 person by visibility 68 categoryराज्य
▪️युवकांच्या माध्यमातून राष्ट्रीय एकतेचा दिला जाणार संदेश
कोल्हापूर : युवक कार्य आणि क्रीडा मंत्रालयाच्या माय भारत या राष्ट्रीय युवा मंचाच्या माध्यमातून “विकसित भारत पदयात्रा” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या अंतर्गत “सरदार@१५० एकता पदयात्रा” या राष्ट्रव्यापी अभियानाची अंमलबजावणी जिल्हा पातळीवर प्रभावीपणे करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, पोलिस उपअधीक्षक तानाजी सावंत, नेहरू युवा केंद्राच्या प्रमुख पूजा सैनी, शिक्षणाधिकारी मीना शेंडकर तसेच विविध शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था तसेच युवक प्रतिनिधींचा सहभाग होता. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी पदयात्रेच्या अनुषंगाने यात्रा मार्ग, सहभागी तसेच विविध कार्यक्रमाच्या अनुषंगाने तयारीबाबत सूचना केल्या.
कोल्हापूर शहरात ८ नोव्हेंबर आणि इचलकरंजी येथे ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता पदयात्रा काढण्यात येणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश राष्ट्रीय अभिमान, एकता आणि नागरी सहभागाची भावना वृद्धिंगत करणे हा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “जनभागीद्वारे राष्ट्रनिर्माण” या दृष्टीकोनातून प्रेरणा घेत, देशातील युवांना राष्ट्रनिर्माणाच्या प्रवासात सहभागी करून घेण्यासाठी माय भारत पोर्टलच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून युवांमध्ये देशभक्ती, सामाजिक जबाबदारी आणि एक भारत – श्रेष्ठ भारत या संकल्पनेबद्दल जागरूकता निर्माण होणार आहे. लौहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेली “सरदार@१५० एकता पदयात्रा” ही भारत सरकार आणि माय भारत यांची संयुक्त पहल असून, भारताच्या एकतेचा आणि अखंडतेचा संदेश देणारी ही पदयात्रा देशभरातील युवकांना प्रेरणा देणार आहे.
केंद्रीय युवक व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी ६ ऑक्टोबर रोजी MY Bharat पोर्टल द्वारे या अभियानाचा डिजिटल टप्पा सुरू केला. या टप्प्यात सोशल मीडिया रील स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा आणि Sardar@150 Young Leaders Program यांचा समावेश आहे. या स्पर्धांमधील निवडलेल्या १५० विजेत्यांना राष्ट्रीय पदयात्रेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
अभियानाचे दोन टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. पहिला टप्पा जिल्हा स्तरावरील पदयात्रांचा असून त्या ३१ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान पार पडतील. प्रत्येक जिल्ह्यात तीन दिवसांच्या या पदयात्रा ८ ते १० किलोमीटर अंतरावर होतील. शाळा व महाविद्यालयांमध्ये सरदार पटेल यांच्या जीवनावर निबंध व वादविवाद स्पर्धा, व्याख्याने, नुक्कड नाटके आयोजित केली जाणार आहेत. तसेच “नशामुक्त भारत” आणि “गर्व से स्वदेशी” या प्रतिज्ञा, योग शिबिरे, आरोग्य व स्वच्छता मोहिमा आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातील.
दुसरा टप्पा राष्ट्रीय पदयात्रेचा असून, तो २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२५ या कालावधीत होणार आहे. ही १५२ किलोमीटरची पदयात्रा सरदार पटेल यांच्या जन्मभूमी करमसाड येथून प्रारंभ होऊन स्टॅच्यू ऑफ युनिटी, केवडिया येथे समाप्त होईल. मार्गावरील गावांमध्ये सामाजिक विकास उपक्रम, सरदार पटेल यांच्या जीवनावर प्रदर्शने, सांस्कृतिक सादरीकरणे तसेच “सरदार गाथा” सत्रे आयोजित केली जातील.
या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी सर्व विभागांना समन्वय साधून कार्यक्रम यशस्वी करण्याचे निर्देश दिले. तसेच युवकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून राष्ट्रीय एकतेचा संदेश समाजात पोहोचवावा, असे आवाहनही करण्यात आले. अभियानाबाबत नोंदणी आणि सविस्तर माहिती MY Bharat पोर्टलवर उपलब्ध आहे: https://mybharat.gov.in/pages/unity_march.