दूरशिक्षण, ऑनलाईन शिक्षण आजची गरज: डॉ. विलास शिंदे
schedule18 Jul 25 person by visibility 228 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : सद्यस्थितीत शिक्षण व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात बदल होत असताना दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण ही आजची गरज असल्याचे प्रतिपादन कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वतीने कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील ८७ अभ्यास केंद्रांतील समन्वयक व लेखनिक यांच्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी आयोजित कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
या वेळी संचालक डॉ. कृष्णा पाटील, संगणक विभागाचे संचालक अभिजीत रेडेकर यांच्यासह उपकुलसचिव व्ही.बी. शिंदे, सिस्टीम प्रोग्रामर आशिष घाटे, आय.टी. प्रतिनिधी अमोल आडगुळे, सहाय्यक कुलसचिव दिलीप मोहाडीकर उपस्थित होते.
डॉ.शिंदे म्हणाले, आज विद्यार्थी संख्या घटण्याचे प्रमाण वाढत आहे. अभिमत विद्यापीठे, खाजगी विद्यापीठे आणि स्वायत महाविद्यालयांची विद्यार्थी संख्या वाढत आहे. वारेमाप पैसा गुंतवून कोणतेही शिक्षण घेता येते, याचे हे द्योतक आहे. पारंपरिक महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमातील बदलांमध्ये होणारा विलंब हेही कारण विद्यार्थी संख्या कमी होण्यामागे आहे. आजच्या शिक्षण व्यवस्थेत दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण हे घटक महत्त्वाचे आहेत. याद्वारे गरजू आणि वंचित यांना शैक्षणिक सेवा प्रदान करण्याचे महत्त्वाचे कार्य साध्य होते. विद्यार्थ्यांना प्रोफेशनल पद्धतीने प्रामाणिकपणे सेवा दिल्यास विद्यार्थी संख्या निश्चितपणे वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अभिजीत रेडेकर म्हणाले, विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविल्यास विद्यार्थी संख्या वाढीचा दर वाढेल. शिक्षण व्यवस्थेत होणारे सकारात्मक बदल प्रामाणिकपणे स्वीकारले पाहिजेत. विद्यार्थ्यांना दर्जेदार, कौशल्यावर आधारित आणि रोजगारभिमुख शिक्षण दिले पाहिजे.
कार्यशाळेत आशिष घाटे, डॉ. मुफिद मुजावर यांनी विविध प्रात्यक्षिके सादर केली. अभ्यासकेंद्राच्या कामकाजाबाबत डॉ. सूर्यकांत गायकवाड, डॉ.नितीन रणदिवे, डॉ.सचिन भोसले, डॉ.सुशांत माने, डॉ.प्रवीण लोंढे, बबन पाटोळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत ४६ अभ्यास केंद्रांतील ६६ समन्वयक आणि लेखनिक यांनी सहभाग घेतला.
यावेळी इंग्लंडमधील बाथ विद्यापीठामध्ये बी.एस्सी. (फायनान्स) पदवी पूर्ण करून दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या एम.ए. (अर्थशास्त्र) प्रथम वर्षात प्रवेश घेतल्याबद्द्ल कु. दिया आवाडे यांना कुलसचिव डॉ. शिंदे यांच्या हस्ते स्वयं अध्ययन साहित्य देण्यात आले.
कार्यशाळेचे समन्वयक डॉ.चांगदेव बंडगर स्वागत केले. संचालक डॉ. पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. नितीन रणदिवे यांनी सूत्रसंचालन केले, तर उपकुलसचिव शिंदे यांनी आभार मानले.