राज्यात गणेशोत्सव होणार आता राज्य महोत्सव : सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार
schedule18 Jul 25 person by visibility 233 categoryराज्य

मुंबई : शेकडो वर्षाची घरगुती गणेशोत्सव परंपरा व अनेक वर्षापासूनची सार्वजनिक गणेशोत्सव परंपरा म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व सामाजिक समरसतेचे मानबिंदू आहे. त्यामुळे राज्यात आता गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज विधानपरिषद आणि विधानसभेत निवेदनाद्वारे केली.
मंत्री ॲड. शेलार म्हणाले, गणेशोत्सवाचे महत्त्व व ओळख संपूर्ण जगभर व्हावी, आपल्या परंपरेची आधुनिकतेशी सांगड व्हावी, सामाजिक व सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचे असणारे गणेशोत्सव हे व्यासपीठ आणखी मजबूत व्हावे, गणेशोत्सवासंबंधी सर्व घटक एकत्र जोडले जावेत, पर्यटन वाढावे, आपल्या समृद्ध परंपरा रितीरिवाजांचे जतन-संवर्धन व्हावे आणि महाराष्ट्राचे स्थान जगाच्या नकाशावर ठळक व्हावे, यासाठी गणेशोत्सव आता राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
राज्याच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रगतीचा पाया सामाजिक एकरुपतेने घातलेला आहे. ही एकरूपता निर्माण होण्यासाठी गणेशोत्सवाने मोलाची भूमिका पार पडलेली आहे. गणेशोत्सवाचे परंपरागत स्वरूप कायम ठेवून त्यास आधुनिकतेची जोड देण्यासाठी आणि राज्याचा प्रत्येक नागरिक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या या महोत्सवाशी जोडला जाण्यासाठी राज्य महोत्सव होणे आवश्यक आहे. यासाठी महाराष्ट्र शासन सुलभकर्ता म्हणून महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, असेही सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले.
▪️राज्य महोत्सवामुळे गणेशोत्सवात विविध उपक्रम
एका लोगोचे अनावरण, व्याख्यानमाला, अध्यात्म नाट्यरंग महोत्सवाचेही आयोजन करण्यात येईल. राज्यातील महत्वाची मंदीरे आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचे देखावे यांचे ऑनलाइन दर्शन घरबसल्या घेता येण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळ अंतर्गत तालुका स्तरावर स्पर्धेद्वारे विविध पारितोषिके देण्यात येतील. घरगुती गणेशोत्सव आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचे फोटो, व्हिडिओ क्लिप्स पोर्टलवर येण्यासाठी एक प्लॅटफॉर्म विकसित करण्यात येईल. ज्या चित्रपटांमधून गणपती विषयक परंपरा, कला संस्कृती दर्शवलेली आहे अशा चित्रपटाचा विशेष गौरव करण्यात येईल. गणेशोत्सवावर आधारित टपाल तिकीट आणि नाणे काढण्यात येईल. गणेशोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण राज्यभरातून गणपतीविषयक रिल्स स्पर्धा आयोजित करण्यात येईल. गणेशोत्सवाच्या निमित्ताने ड्रोनशो चे आयोजन करणे प्रस्तावित आहे. या राज्य महोत्सवाची माहिती संपूर्ण देशभर व्हावी यासाठी देशभरात प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विशेष कार्यक्रम, उपक्रम हाती घेण्यात येतील. गणेश उत्सवाच्या दरम्यान प्रमुख ठिकाणी विद्युत रोषणाई व सुशोभीकरण करण्यात येईल.