पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचा शाश्वत विकास साधण्यासाठी प्रयत्न करुया : जिल्हाधिकारी अमोल येडगे
schedule18 Jul 25 person by visibility 201 categoryराज्य

कोल्हापूर : पर्यटन विभागाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या 'आई' सारख्या योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यात पर्यटन वृद्धीला वाव असणाऱ्या ठिकाणांचा विकास साधूया, असे आवाहन करुन पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचा शाश्वत विकास साधण्यासाठी प्रयत्न करुया. यासाठी पर्यटन क्षेत्रात कार्यरत सर्व व्यक्ती, संस्था, संघटनांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा पर्यटन स्थळ व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल येडगे यांनी केले.
नवीन पर्यटन धोरण, 'आई' योजना, बुकींग इंजिन व निधी प्लस याबाबतची माहिती देण्यासाठी पर्यटन क्षेत्रात कार्यरत व्यक्तींसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी विभागीय पर्यटन कार्यालयाच्या प्रभारी उपसंचालक शमा पवार, महसूल उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश पवार, कोल्हापूरचे सहाय्यक जिल्हा पर्यटन अधिकारी गुणवंत पवार, आई योजनेचे प्रकल्प अधिकारी मयुर नांद्रे, सिंधुदुर्गचे सहाय्यक जिल्हा पर्यटन अधिकारी अजिंक्य लुगडे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, जिल्ह्यातील श्री अंबाबाई, जोतिबा, पन्हाळा अशी अनेक पर्यटन स्थळे सर्वांना परिचित असून या ठिकाणांना भेटी देण्यासाठी जिल्ह्यात देश विदेशातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. परंतू पर्यटन वृद्धीला वाव असणाऱ्या अन्य पर्यटन स्थळांचा व ग्राम पर्यटनाचाही विकास करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांकडे जगभरातील जास्तीत जास्त पर्यटकांना आकर्षित करुन त्यांचे जिल्ह्यातील मुक्कामाचे दिवस वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, जेणेकरुन पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचा आर्थिक विकास साधला जाईल. त्याचबरोबर कोल्हापुरी साज, कोल्हापुरी चप्पल अशा कोल्हापूरच्या वैशिष्ट्यपूर्ण वस्तूही मोठ्या प्रमाणात जगभर पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने अनेक योजना राबविण्यात येत असून पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, संस्थांनी या योजनांचा लाभ घेऊन जिल्ह्याची पर्यटन वृद्धी साधावी. तसेच जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करुन निकषांची पूर्तता करणाऱ्या आई योजनेच्या जास्तीत जास्त लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देऊन उद्दिष्ट पूर्ण करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात धार्मिक, ऐतिहासिक, उद्योग, वैद्यकीय अशा विविध प्रकारची पर्यटन स्थळे आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी ग्रामीण पर्यटन स्थळांसह पर्यटन क्षेत्रात भरीव काम करणे आवश्यक आहे.
नुकतेच पर्यटन धोरण २०२४ प्रसिध्द करण्यात आले आहे. नवीन पर्यटन धोरणाची व पर्यटन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या पर्यटन व्यावसायिकांसाठीच्या वेगवेगळया योजनांच्या माहितीची प्रचार व प्रसिध्दी होण्यासाठी ही कार्यशाळा घेण्यात आली आहे. पर्यटन क्षेत्रामध्ये कार्यरत व्यक्ती व संस्थांनी पर्यटन विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी उपसंचालक शमा पवार यांनी केले.
महसूल उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रत्येक भागाचा पर्यटन विकास साधण्यासाठी टूर ऑपरेटर्स, हॉटेल व्यवसायिक, ट्रॅव्हल एजंट यांनी प्रयत्न करावेत. त्याचबरोबर जिल्ह्यात ट्रेकिंगलाही चांगला वाव असून जिल्ह्याचे पदभ्रमंती मार्ग (ट्रेक रुट) जगाच्या नकाशावर आणण्यासाठी प्रयत्न करुया.
या कार्यशाळेत नवीन पर्यटन धोरण, 'आई' योजना, बुकींग इंजिन, निधी प्लस तसेच पर्यटन विभागाच्या योजनांची माहिती देण्यात आली. कार्यशाळेत जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिक, टूर ऑपरेटर, ट्रॅव्हल एजंट, कृषी पर्यटन केंद्रचालक, बँकर्स व इतर पर्यटन व्यावसायिक सहभागी झाले.