शिक्षकांच्या क्रीडा स्पर्धांना 7 नोव्हेंबरपासून कोल्हापुरात प्रारंभ
schedule29 Oct 25 person by visibility 72 categoryराज्य
कोल्हापूर : शिक्षण विभागाच्या पर्यवेक्षीय यंत्रणेतील अधिकारी तसेच प्राथमिक , माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामध्येसहकार्य व स्पर्धात्मक भावना त्याचबरोबर डिजिटल भाषिक व सादरीकरण कौशल्याला चालना देण्याच्या उद्देशाने तालुका,जिल्हा व राज्यस्तरावर 42 प्रकारच्या विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरात येत्या 7 नोव्हेंबरपासून क्रीडा स्पर्धांना प्रारंभ होणार असल्याची माहिती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे (डाएट) प्राचार्य डॉ.रमेश होसकोटी यांनी दिली. या स्पर्धा आयोजनाच्या अनुषंगाने आज संस्थेच्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
खो - खो व हॉलीबॉल या दोन क्रीडा प्रकारांमध्ये सांघिक तर बॅडमिंटन,लांब उडी,थाळी / गोळा / भाला फेक तसेच धावणे अशा सहा क्रीडा प्रकारांमध्ये वैयक्तिक स्वरूपात शिक्षक, अधिकारी ,कर्मचारी यांना स्वयंप्रेरणेने सामील होता येणार आहे.मात्र या स्पर्धेत सामील होत असताना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता संबंधित शिक्षकांनी घ्यावी.
तालुकास्तरावर होणाऱ्या या क्रीडा प्रकारांमधून जिल्ह्यातील 12 तालुके व महानगरपालिकेतील दोन अशा एकूण 14 खेळाडूंची जिल्हा व राज्यस्तरावर निवड करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली .ही स्पर्धा कोल्हापूर विभागातील सातारा,कोल्हापूर,रत्नागिरी,सांगली व सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी होणार आहे .या आढावा बैठकीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, तेजस्विनी आळवेकर,श्रीमती वैशाली पाटील,आर व्ही कांबळे ,जे टी पाटील,भ.गु चौगुले, श्रीमती खामकर आदी उपस्थित होते .